दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत जावलीचाही समावेश; ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश; जिल्ह्यातील अन्य तालुक्यांनाही मिळाला न्याय

by Team Satara Today | published on : 14 October 2026


सातारा : राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीमध्ये सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्याचा समावेश झालेला नव्हता. यामुळे तालुक्यातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आमदार तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे जावली तालुकाही दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
ना. शिवेंद्रसिंहराजेंमुळे पाटण, कोरेगाव, वाई, कराड या तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त म्हणून समावेश झाला आहे. जावली व अन्य तालुके दुष्काळी म्हणून जाहीर केल्याबद्दल ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ना. सुनेत्रा अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचे आभार मानले आहेत.  
राज्य शासनाने यापूर्वी राज्यातील २६५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले होते. दुष्काळी तालुक्यांच्या जाहीर केलेल्या यादीमध्ये सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यासह पाटण, कोरेगाव, वाई, कराड या तालुक्यांचा समावेश झालेला नव्हता त्यामुळे या तालुक्यातील शेतकरी आणि जनतेमध्ये नाराजी पसरली होती. ट्रिगर १ निकषानुसार या तालुक्यांचा दुष्काळी तालुके म्हणून समावेश झाला नव्हता.  दरम्यान, पावसाच्या कमतरतेचा प्रत्यक्ष शेती किंवा वनस्पतीवर परिणाम झाल्याचे निदर्शनास येणे, याला ट्रिगर २ असे संबोधले जाते. म्हणजे केवळ पाऊस कमी नाही तर, त्याचा पिकांवर प्रत्यक्ष परिणाम झाला आहे असा पुढचा स्तर आहे. त्यामुळे ट्रिगर २ च्या निकषांमध्ये जावली व अन्य तालुक्याबाबत योग्य निर्णय होईल. या तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे, त्यामुळे या तालुक्यांचाही समावेश दुष्काळी तालुके म्हणून केला जाईल, असा शब्द ना. शिवेंद्रसिंहराजेंनी जनतेला दिला होता.                                 ना. शिवेंद्रसिंहराजेंनी यासंदर्भात महसूल मंत्री बावनकुळे यांच्या सोबत चर्चा केली होती. तसेच तातडीने हे तालुके दुष्काळी म्हणून जाहीर करण्यासाठी राज्य सरकरकडे त्यांचा पाठपुरावा सुरु केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला मोठे यश आले असून राज्य शासनाने नुकताच अध्यादेश काढून सातारा जिल्ह्यातील जावलीसह पाटण, कोरेगाव, वाई, कराड हे तालुके दुष्काळी म्हणून जाहीर केले आहेत. शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या यादीमध्ये या तालुक्यांचा समावेश झाल्याने जनतेमध्ये आणि विशेष करून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, नवीन यादीनुसार सातारा जिल्ह्यातील सर्व ११ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाले आहेत.
आता या दुष्काळग्रस्त तालुक्यांना जमीन महसूलात सूट, पिक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीजबिलात सूट,  शालेय/ महाविद्यालयीन विध्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत  कामाच्या निकषात शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरु करणे, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे, शेतीवर आश्रीत शेतकरी, शेतमजूर यांना अन्नधान्याची टंचाई होणार नाही याबाबत व्यवस्था उभी करणे, जनावरांना आवश्यक चार उपलब्ध होईल याची व्यवस्था करणे, जलसंधारणाची कामे सुरु करणे, पूर्वीच्या शासन निर्देशाप्रमाणे पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाण्याचे नियोजन करणे या उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गर्दीच्या ठिकाणी चोरी करणाऱ्या कराडमधील पती-पत्नीच्या टोळीवर मोक्का; गुन्ह्यांची गंभीर दखल; विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून कारवाईला मंजुरी
पुढील बातमी
दूध वाहतुकीसाठी प्लास्टिक कॅन ऐवजी स्टेनलेस स्टीलच्या कॅनचाच वापर करा; अन्न व औषध प्रशासनाचे जिल्ह्यातील दुग्ध व्यावसायिक, हॉटेल चालकांना विशेष आवाहन

संबंधित बातम्या