मुंबई : उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या शीत लहरींमुळे सोमवारपासूनच मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका वाढणार आहे. मुंबईचे किमान तापमान १३ अंश सेल्सिअस तर राज्यभरातील बहुतांशी शहरांचे किमान तापमान ६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येईल, अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे. त्यामुळे मधल्या काळात गायब झालेली थंडी पुन्हा पडणार असून, हा आठवडा कडाक्याच्या थंडीचा असणार आहे.
याबाबत हवामान अभ्यासक अथ्रेय शेटटी यांनी सांगितले, उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी पडणार आहे. येथील थंड वारे दक्षिणेकडे वाहण्यास सुरुवात होईल. याचा प्रभाव रविवारपासूनच मुंबईसह महाराष्ट्राला जाणवू लागेल. सोमवारपासून यात आणखी भर पडेल आणि आठवडाभर थंडीचा कडाका कायम राहील. विशेषत: १०, ११ आणि १२ डिसेंबर या तीन दिवशी किमान तापमानाचा पारा कमालीचा खाली येईल. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात सगळीकडे थंडीचा कडाका असेल. ७ आणि ८ डिसेंबर रोजी विदर्भातील काही भागात शीत लहरीचा प्रभाव असण्याची शक्यता आहे. आयएमडीने येत्या ४ आठवड्यांसाठी संपूर्ण देश पातळीवर हवामानाचा अंदाज सांगितला आहे. पहिले २ आठवडे उत्तरेकडील बहुतांश आणि काही इतर ठिकाणे वगळता अनेक ठिकाणी तापमान कमी असेल.