तरुणांच्या स्वप्नांचा आंबेनळी घाटातील भीषण अपघाताने एका क्षणात चक्काचूर; पाच जिवलग मित्रांच्या मृत्यूने हळहळले आसगाव

by Team Satara Today | published on : 27 May 2026


सातारा : दोन दिवसांत परत येतो, असे सांगून घराबाहेर पडलेले पाच मित्र पुन्हा कधीच परतले नाहीत. कोकणातील पर्यटनाचा आनंद घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेल्या या तरुणांच्या स्वप्नांचा आंबेनळी घाटातील भीषण अपघाताने एका क्षणात चक्काचूर केला. या दुर्घटनेची बातमी समजताच सातारा तालुक्यातील ‘आसगावा’वर (पुनर्वसित) शोककळा पसरली.

सातारा शहरापासून अवघ्या १२ किलोमीटरवर जरंडेश्वरच्या पायथ्याशी वसलेले आसगाव हे गाव ग्रामस्वच्छता अभियानातील राज्यातील प्रथम क्रमांकामुळे ओळखले जाते. मात्र, रविवारी या गावातील प्रत्येक घरात अस्वस्थता आणि भीतीचे वातावरण होते. रात्री कोकणातून निघालेली गावातील पाच तरुण मुले घरी पोहोचली नव्हती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी वारंवार मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला.

कधी फोनची रिंग वाजत होती, तर कधी फोन ‘नॉट रिचेबल’ लागत होता. प्रत्येक क्षणागणिक पालकांची चिंता वाढत होती. मुलांचा अपघात तर झाला नसेल ना. ही भीती काहींच्या मनात घर करू लागली आणि दुर्दैवाने तीच भीती खरी ठरली. सोमवारी पहाटे या पाचही तरुणांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती गावात पोहोचली आणि संपूर्ण गाव सुन्न झाले.

हंबरडा आणि अश्रूंचे बांध फुटले..

एकाच वेळी पाच घरांतील दिवे विझल्याने आसगाव अक्षरशः शोकसागरात बुडाले. गावात सर्वत्र हंबरडा आणि अश्रूंचे बांध फुटत होते. आई-वडिलांचा आक्रोश, मित्रांचे हुंदके आणि नातेवाइकांचे अश्रू पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. आंबेनळी घाटातील या दुर्घटनेने पाच तरुणांचे नव्हे, तर पाच कुटुंबांचे भविष्य हिरावून घेतले.

एकत्र वाढले, घरेही शेजारी-शेजारीच...

हे पाचही मित्र लहानपणापासून एकत्र वाढले होते. त्यांची घरेही शेजारीच होती. कुठेही फिरायला जायचे म्हटले की, हे मित्र एकत्र असायचे. प्रत्येकाच्या डोळ्यांत भविष्यासाठी वेगवेगळी स्वप्ने होती. कोणाला पोलिस भरती होऊन गणवेश परिधान करायचा होता, कोणाला फोटोग्राफीच्या क्षेत्रात करिअर करायचे होते, तर कोणाला शिक्षण पूर्ण करून मेडिकल क्षेत्रात जायचे होते. मात्र, नियतीने त्यांच्या आयुष्याचा प्रवास अर्ध्यावरच थांबवला.

या स्वप्नांचे काय ?

१) महेश पवार हा तरुण मराठी सिरीयलमध्ये फोटोग्राफी करायचा. त्याने घरची आर्थिक परिस्थिती सुधारली होती. आता कुठे तो घरातील कर्ता म्हणून पुढे आला होता. मात्र, या अपघाताने कुटुंबाचा आधारवड हरवला. तो एकुलता एक आहे. त्याच्या पश्चात आईवडील, विवाहित बहीण आहे.

२) आदित्य साळुंखे हा साताऱ्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याच्या बहिणीचे २० दिवसांपूर्वीच विवाह झाला. त्याला मेडिकलला जायचे होते. त्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होते. तोसुद्धा एकुलता एक होता. त्याला वडील नाहीत. आता घरात केवळ आईच आहे.

३) रितेश लोखंडे हा पोलिस भरती होण्यासाठी साताऱ्यातील एका अकॅडमीमध्ये सराव करत होता. भरती होऊन त्याला घरची परिस्थिती बदलायची होती. त्याच्या पश्चात आईवडील, एक भाऊ आहे.

४) सुहास लोखंडे हा रील्स स्टार होता. साताऱ्यात काॅलेज करत तो रील्स बनावायचा. रील्समधून त्याला पुढे करिअर करायचं होतं. यासाठी तो तांत्रिक बाबीचे शिक्षण घेत होता. त्याच्या पश्चात एक बहीण आणि आजी, आजोबा आहेत.

५) अंश चव्हाण हा पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. त्याला मोठेपणी उद्योजक व्हायचं होतं. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण आहे. तोसुद्धा एकुलता एक होता.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
घाट रस्त्यांची दुरवस्था आणि सुरक्षेचा अभाव; आंबेनळी घाट आजही डेंजरझोनमध्येच, संरक्षक कठडे, रेलिंग, सुरक्षाभिंती नसल्याने अपघातांचा धोका कायम

संबंधित बातम्या