अंध व दिव्यांग मतदारांना मतदानासाठी सहाय्यक सुविधा; निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे मतदानाच्या तीन दिवस आधी नोंदणी करण्याचे आवाहन

by Team Satara Today | published on : 18 October 2026


सातारा : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अंध व दुर्बल मतदारांना मतदानाचा हक्क बजावणे सुलभ व्हावे, यासाठी साथीदाराची (सहाय्यकाची) सुविधा उपलब्ध करून देताना निवडणूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सुविधेचा लाभ पात्र मतदारांनाच मिळावा आणि मतदान प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार पार पडावी, यासाठी  अंध किंवा दुर्बल मतदारांना साथीदाराची सुविधा देताना निर्धारित प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे. त्यानुसार, ज्या मतदारांना अंधत्व किंवा दुर्बलतेमुळे साथीदाराची मदत आवश्यक आहे, त्यांनी मतदानाच्या दिनांकापूर्वी किमान तीन दिवस आधी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी सूचना देणे बंधनकारक आहे.
साथीदार सुविधेसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची संबंधित जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून तपासणी केली जाणार आहे. विहित तरतुदींनुसार पात्र ठरणाऱ्या मतदारांच्या नावासमोर मतदार यादीत आवश्यक खूण करून नोंद घेतली जाईल. अशा नोंदी असलेल्या मतदार याद्या संबंधित मतदान केंद्रांना उपलब्ध करून देण्याची दक्षता घेण्यात येणार आहे. त्यामुळे मतदान केंद्रांवर आवश्यक माहिती वेळेत उपलब्ध होऊन प्रक्रिया अधिक सुसूत्रपणे राबविण्यास मदत होणार आहे.
मतदानाच्या दिवशी मतदान करण्यापूर्वी संबंधित मतदाराने अंध किंवा दुर्बल असल्याबाबत परिशिष्ट XI(ii)-C मधील विहित नमुन्यात घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतरच केंद्राध्यक्षांनी नियम ४०अ नुसार पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, साथीदार सुविधेचा लाभ घेतलेल्या मतदारांबाबत निवडणूक संचालन नियम, १९६१ मधील नमुना १४अ मध्ये आवश्यक अभिलेख ठेवणे बंधनकारक आहे. या नोंदी अचूक व पूर्ण असाव्यात, याची विशेष दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे.
मतदानानंतर दुसऱ्या दिवशी नमुना १४अ ची छाननी निवडणूक निरीक्षकांकडून करण्यात येणार आहे. यासाठी व्हिडिओ चित्रीकरणाच्या सीडी, सूक्ष्म निरीक्षकांचा अहवाल, केंद्राध्यक्षांचा अहवाल आणि इतर संबंधित कागदपत्रांसोबत हा नमुना तपासला जाणार आहे. त्यामुळे सर्व मतदान केंद्रांवरील नमुना १४अ पूर्णपणे भरलेला व स्वाक्षरीत असल्याची खात्री करून तो विहित वेळेत इतर निवडणूक साहित्यांसोबत जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्या प्रशिक्षणादरम्यान या सूचनांची सविस्तर माहिती देणे, सर्व मतदान केंद्रांना घोषणापत्रांचे नमुने व नमुना १४अ पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देणे, तसेच साथीदार सुविधेसाठी प्राप्त अर्ज आणि पात्र मतदारांची केंद्रनिहाय यादी संबंधित केंद्राध्यक्षांना देणे, अशा कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहेत. मतदानानंतर आवश्यक अभिलेख संकलित करून ते निरीक्षकांच्या छाननीसाठी उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही संबंधित यंत्रणेवर सोपविण्यात आली आहे.
अंध व दुर्बल मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देतानाच निवडणूक प्रक्रियेची शिस्त, पारदर्शकता आणि नियमबद्धता कायम राखण्यावर या निर्देशांमधून भर देण्यात आला आहे. सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि कोणतीही अनियमितता होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिले आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आता कामगिरी दाखवा, अनुदान मिळवा; ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांसाठी १६ व्या वित्त आयोगाचे कडक निकष
पुढील बातमी
पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदारांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा; खासगी आस्थापनातील मतदारांना दोन ऐवजी चार तासाची विशेष सवलत

संबंधित बातम्या