कराड: मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर संवाद साधण्यासाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा आयोजित केला आहे. त्याअंतर्गत सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात ११ व १२ ऑगस्ट रोजी दोन जाहीर संवाद बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मराठा समाजबांधवांनी दिली.
दौऱ्याच्या पहिल्या दिवशी मंगळवारी ११ ऑगस्टला मसूर येथे, तर दुसऱ्या दिवशी बुधवारी १२ ऑगस्टला आटके येथे जरांगे-पाटील यांची जाहीर संवाद बैठक होणार आहे. या सभांमध्ये मराठा समाजातील युवक-युवती, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच समाजबांधवांशी थेट संवाद साधला जाणार आहे.
या दौऱ्याचा मुख्य उद्देश मराठा समाजातील नागरिकांच्या विविध अडचणी जाणून घेणे, शैक्षणिक व रोजगारासंदर्भातील प्रश्न समजून घेणे, आरक्षणाशी संबंधित दाखले मिळवताना येणाऱ्या अडचणी तसेच समाजाला मिळालेल्या आरक्षणाच्या अनुषंगाने शासकीय स्तरावर भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती घेणे हा आहे. संबंधित विषयांवर मार्गदर्शन करून शासनाकडे पाठपुरावा करण्याचाही प्रयत्न करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर कराड दक्षिण व कराड उत्तर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजातील सर्व बंधू-भगिनी, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक तसेच समाजबांधवांनी मोठ्या संख्येने दोन्ही बैठकींना उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.