लाडकी बहीण योजनेमुळे शरद पवारांच्या पोटात दुखतंय

आ. जयकुमार गोरे : वडूजमध्ये रेकॉर्डब्रेक गर्दीत साजरा झाला लाडकी बहीण सन्मान सोहळा

by Team Satara Today | published on : 06 October 2024



सातारा : आमच्या महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण योजना सुरु करुन माता - भगिनींच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार देण्याचा निर्णय अंमलात आणला. पण त्यामुळे शरद पवारांच्या पोटात दुखायला लागले आहे. फुकटचे खायची सवय लावू नका, असे सुप्रिया सुळेही सांगू लागल्या आहेत. तसे पहायला गेले तर फुकटचे खायची सवय पवारानांच आहे. त्यांनी आम्ही सुरु केलेल्या योजनेला विरोध करु नये. आमचे सरकार ही योजना पुढेही सुरुच ठेवणार असल्याचे आ. जयकुमार गोरे यांनी सांगितले.

वडूज येथे भाजपच्या वतीने आयोजित लाडकी बहीण सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मा. आ. दिलीपराव येळगावकर, सोनिया गोरे, अरुण गोरे, आप्पासाहेब पुकळे, तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण, शिवाजीराव शिंदे, नगराध्यक्षा मनीषा काळे, शिवाजी सर्वगौड, एन. एस. गोडसे, वडूजचे नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

आ. गोरे पुढे म्हणाले, भाजपा प्रणित केंद्र आणि महायुतीच्या राज्यसरकारने महिला, माता, भगिनींसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. त्या सर्व योजनांची अंमलबजावणी सुरु असून लाखो महिलांना त्याचा लाभही मिळत आहेत. महाविकास आघाडीचे शरद पवार, नाना पटोले, उध्दव ठाकरे, वड्डेटीवार हे सावत्र भाऊ या योजनांची खिल्ली उडवत आहेत. आजच्या कार्यक्रमाला झालेली महिलांची तुडुंब गर्दी म्हणजे विरोधकांना चपराक आहे. आमचे सरकार या सर्व योजना पुढे सुरुच ठेवणार आहे. सर्व माता-भगिनींचे आशिर्वाद मिळून पुन्हा आमचेच सरकार सत्तेत येणार आहे.

आ. गोरे पुढे म्हणाले, मतदारसंघातील 70 टक्के भागात पाणी पोहचले आहे. उरलेल्या भागात आणि शेतकर्‍यांच्या बांधावर येणार्‍या तीन वर्षात पाणी पोहचवल्यावर फक्त डोंगरावरील तीन गावे सोडून आपल्याला कुणी दुष्काळी म्हणणार नाही. दहा, बारा एकर शेती असलेले आपले शेतकरी पाणी आल्याने बागायती शेती करु लागले आहेत. परिस्थिती बदलत असल्याने बारामतीसारख्या सधन भागातील लोक मुलींसाठी स्थळे शोधायला आपल्या भागात यायला लागले आहेत. माण - खटावच्या स्वाभिमानी मातीतील स्वाभिमानी जनतेने पाठिशी रहाणार्‍या महायुतीच्या पाठिशी रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

 

चार वेळा माता भगिनींच्या गर्दीत जावे लागले आ. जयकुमार गोरेंना वडूज येथील लाडकी बहीण सन्मान सोहळ्याला तोबा गर्दी झाली होती. त्यामुळे आ. जयकुमार गोरेंना तब्बल चार वेळा महिलांच्या गर्दीत जावून सन्मान सोहळ्याचे नियोजन करावे लागले. मुख्य वॉटरप्रुफ मंडपासह इतर दोन मंडप भरले तरी माता भगिनी कार्यक्रमासाठी येतच होत्या. आलेल्या प्रत्येक महिलेचा सन्मान होताना आ. गोरे जातीने लक्ष ठेवून होते.   आम्हाला दिवसा तारे दिसले… महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम रोहित माने, शिवाली परब आणि नृत्यांगना सोनाली कुलकर्णी वडूजमधील माता-भगिनींची गर्दी पाहून भारावून गेल्या होत्या. त्यांनी स्कीटसह विविध अदाकारी पेश केल्यावर इतकी गर्दी पाहून आम्हाला दिवसा तारे दिसल्याचे आणि जमलेल्या हजारो बहिणी आ. गोरेंच्या पाठिशी ठाम उभ्या राहतील, असा विश्‍वास व्यक्त केला.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पाचगणी येथे पुरुषोत्तम जाधव यांच्या जनसंवाद यात्रेचे स्वागत
पुढील बातमी
कास पठार पाहण्यासाठी निघालेल्या पर्यटकांच्या कारचा भीषण अपघात

संबंधित बातम्या