फर्न हॉटेल ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक मार्गावर 'नो पार्किंग’ची अंमलबजावणी, सर्विस रोडवर अवजड वाहनांना ब्रेक’; बेकायदा पार्किंग केल्यास कारवाई,

by Team Satara Today | published on : 07 October 2026


सातारा : महामार्गालगतच्या सर्विस रोडवर अवजड वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्‍या वाहनचालकांना आता चाप बसणार आहे. फर्न हॉटेल ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक या मार्गावर अवजड वाहनांसाठी नो पार्किंग’ लागू करण्यात आले असून, रस्त्यावर वाहने उभी करणार्‍यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा वाहतूक शाखेने दिला आहे.
या सर्विस रोडवर विशेषतः रात्रीच्या वेळी ट्रक, कंटेनर आणि अन्य अवजड वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली जातात. त्यामुळे उपलब्ध रस्ता अरुंद होऊन दुचाकी आणि चारचाकी वाहनांना कसरत करावी लागते. काही ठिकाणी उभ्या वाहनांमुळे समोरील वाहतूक दिसत नसल्याने अपघाताचा धोका निर्माण होतो. रात्रीच्या वेळी हा धोका अधिक वाढतो.
सर्विस रोड वाहतुकीसाठी की पार्किंगसाठी? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. वाहनतळाची सुविधा नसल्याचे कारण देत सार्वजनिक रस्त्यावर वाहने उभी करणे योग्य ठरू शकत नाही. त्यामुळे नो पार्किंग’ नियमाची केवळ घोषणा न करता त्याची सातत्याने अंमलबजावणी होण्याची गरज आहे.
वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी नियमांचे उल्लंघन करणार्‍या अवजड वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे वाहनचालकांनी सर्विस रोडवर अनधिकृत पार्किंग टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, नियमित गस्त, स्पष्ट सूचना फलक आणि सातत्यपूर्ण कारवाई झाली तरच या मार्गावरील बेशिस्त पार्किंगला कायमचा आळा बसू शकतो.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साहिल जाधवने सातार्‍याचे नाव सातासमुद्रापार झळकावले - ना. शिवेंद्रसिंहराजे; सुवर्णपदक विजेत्या साहिलचा केला सन्मान
पुढील बातमी
सातार्‍याच्या मातीत उमटतोय जलसंधारणाचा नवा इतिहास ! 1,500 हून अधिक वनराई बंधारे पूर्ण

संबंधित बातम्या