सातारा : नगराध्यक्ष पदाच्या मुद्द्यावरून मनोमिलनांमध्ये टोकाचा स्नेह ताणला गेलेला असताना अचानक बाबाराजे समर्थक अमोल मोहिते यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची माळ पडली. त्यावरून सातारा विकास आघाडीच्या अपेक्षांना जोरदार धक्का लागला आणि उदयनराजे समर्थक संग्राम बर्गे यांना राजकीय संधीने हुलकावणी दिली. त्यामुळे अजूनही सातारा विकास आघाडीच्या कोर्टामध्ये राजकीय शांतता आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या मनात नक्की काय सुरू आहे याची समर्थकांमध्ये चलबिचल वाढली आहे. या संपूर्ण प्रकरणावर उदयनराजे भोसले यांनी कोणतीही अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. मनोमिलन हे घट्ट जरी असले तरी त्याची आंतरिक वीण ही दोन्ही बंधूंनी असोशीने जपली आहे. मात्र कार्यकर्त्यांमध्ये टोकाचा अंतर्गत आंतरविरोध पाहायला मिळतो आहे. शहराच्या पश्चिम भागामध्ये उमेदवारांचे बॅनर लागू लागले आहेत, त्यावरून उदयनराजे भोसले यांचा फोटो गायब असल्याने त्याच्यावरूनही म्हणून मनोमिलन ताणले जाण्याची शक्यता आहे. सातारा विकास आघाडीने यंदाच्या निवडणुकीत 18 महिला उमेदवार आणि सात पुरुष उमेदवार दिले आहेत. त्यामुळे निवडून आल्यानंतर सभा कामकाज चालवण्याची मोठी जबाबदारी पुन्हा एकदा दत्तात्रय बनकर व पक्षप्रतोद निशांत पाटील यांना चालवावी लागणार आहे. त्यानंतर प्रभाग 11 मधून अपक्ष निष्ठा व्यक्त करणारे वसंत लेवे यांनी विजयाचा गुलाल आपलाच आहे असा दावा केला आहे. ते निवडून आल्यास सातारा विकास आघाडीची बाजू भक्कम होणार आहे.
पण सध्याची राजकीय शांतता ही वादळापूर्वीची तर नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे. भाजपने साताऱ्यात पक्षीय ध्येयधोरण जरी राबवले तरी खऱ्या अर्थाने आता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आघाड्यांचे राजकारण सुरू झाले आहे. मनोमिलनच्या 50 उमेदवारांना 50 अपक्षांनी आव्हान दिल्याने साताऱ्याचे राजकारण नक्की कोणत्या वळणावर जाणार याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
साताऱ्याचा बच्चन सायलेंट मोडवर
खासदार उदयनराजे भोसले यांना त्यांचे समर्थक आवडीने साताऱ्याचा बच्चन म्हणतात. पुष्पा चित्रपटातल्या अल्लू अर्जुन प्रमाणे झुकेगा नही साला अशी सिग्नेचर ॲक्शन करत उदयनराजे यांचा दबंग अंदाज नेहमीच पाहायला मिळतो. मात्र उदयनराजे यांच्या आवडीचा खंदा कार्यकर्ता नगराध्यक्षपदाच्या शर्यतीतून अचानक बाहेर पडल्यापासून उदयनराजे सायलेंट मोडवर आहेत. कदाचित त्यांची नाराजी व्यक्त करायला ही वेळ नाही आणि व्यासपीठही नाही. नगरपालिका निवडणुकीची धामधूम असल्याने उदयनराजे यांनी कोणतीही अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. जलमंदिर येथे सातारा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलवण्यात आल्याची माहिती आहे. सातारा विकास आघाडी अपक्षांना रसत पुरवण्याचा छुपा अजेंडा राबवणार तर नाही ना याची भीती आता बाबाराजे समर्थकांना वाटत आहे. कारण उदयनराजे यांचा गनिमी कावा आणि धक्कातंत्र हे संपूर्ण सातारा शहराला ठाऊक आहे. एका रात्रीत प्रभागाची समीकरणे फिरवण्यात उदयनराजे यांचा हात कोणी धरू शकत नाही. त्यामुळे उदयनराजे यांची चुप्पी बऱ्याच राजकीय प्रश्नांना जन्म देत आहे.