सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांच्या कुणबी जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत सहा जणांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर सुनावणी व दोन्ही बाजूचे युक्तीवाद आणि कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर समितीने डॉ. प्रिया शिंदे यांचे कुणबी जात प्रमाणपत्र वैध ठरवले आहे. समितीने दि. २६ नोव्हेंबर रोजी हा निर्णय जाहीर केला. जात पडताळणी समितीच्या या निर्णयामुळे जिल्हा परिषद अध्यक्षा असलेल्या डॉ. प्रिया शिंदे यांना दिलासा मिळाला आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक २० मार्च २०२६ रोजी झाली होती. हे पद ओबीसी महिलेसाठी राखीव होते. डॉ. प्रिया शिंदे यांनी कुणबी जात प्रमाणपत्राच्या आधारे अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर मतदान प्रक्रियेतून त्यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली. मात्र त्यांच्या कुणबी जात प्रमाणपत्राबाबत वैभव गवळी, जयदीपकुमार मगर, पांडूरंग भोसले, संतोष साळुंखे, प्रवीण धस्के, मनिषा फडतरे यांनी आक्षेप घेत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती.
डॉ. प्रिया शिंदे यांनी चुकीचे पुरावे सादर करून कुणबी जात प्रमाणपत्र मिळवले असून त्यांच्या जात प्रमाणपत्राची वैधता तपासण्यात यावी अशी मागणी तक्रारदारांनी केली होती. या तक्रारीनंतर जात पडताळणी समितीसमोर सुनावणी प्रक्रिया सुरू झाली. दोन्ही बाजूंनी विविध कागदपत्रे, पुरावे आणि युक्तीवाद सादर करण्यात आले. दि. १४ ऑक्टोबर रोजी या प्रकारणाची अंतिम सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंना लेखी युक्तीवाद व आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्यानुसार दोन्ही पक्षांनी कागदपत्रे व लेखी म्हणणे समितीसमोर सादर केले. समितीने सादर करण्यात आलेल्या सर्व कागदपत्रांची तपासणी करून निर्णय प्रक्रिया पूर्ण केली. यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष जीवन गलांडे, उपायुक्त उमेश घुले, समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांनी या प्रकरणाचा निर्णय घेतला. दरम्यान, तक्रारदारांना समितीच्या निर्णयाविरोधात ९० दिवसाच्या आत विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल करण्याची संधी आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांना दिलासा; जात प्रमाणपत्र वैध, सर्व कागदपत्रांची तपासणी करून निर्णय प्रक्रिया पूर्ण
by Team Satara Today | published on : 28 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा