पोस्टरमध्ये एक महिला सैनिक मोठ्या आत्मविश्वासाने आपल्या कपाळावर कुंकू लावताना दिसते आणि तिच्या दुसऱ्या हातात बंदूक आहे. हे पोस्टर देशभक्ती, सामर्थ्य आणि नारीशक्ती यांचे प्रतीक मानले जात आहे. विशेष म्हणजे, पोस्टरमध्ये त्या महिलेचा चेहरा अस्पष्ट ठेवण्यात आला आहे, त्यामुळे ही भूमिका कोण साकारत आहे याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
'ऑपरेशन सिंदूर' या चित्रपटाचे काम 'निक्की विकी भगनानी फिल्म्स' आणि 'द कंटेंट इंजिनिअर' करणार आहेत. तर त्याचे दिग्दर्शन उत्तम-नितीन या दिग्दर्शक जोडीने केले आहे. यापूर्वीही या जोडीने देशभक्तीवर आधारित काही लघुपट आणि वेब प्रोजेक्ट्समध्ये काम केलं असल्याने प्रेक्षकांमध्ये त्यांच्याकडून अधिक वास्तविक मांडणीची अपेक्षा आहे. चित्रपटाचे संगीत, पार्श्वसंगीत आणि सिनेमॅटोग्राफी यासाठी आघाडीच्या कलाकारांची निवड करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. ऑपरेशन सिंदूरवर आधारित या चित्रपटाचे पोस्टर मानव मंगलानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. पण काही वेळानंतर ते हटवण्यात देखील आले.
हा चित्रपट केवळ कारवाईवर आधारित नसून, या मोहिमेमागील रणनीती, त्यात सहभागी असलेल्या जवानांचे बलिदान आणि देशासाठी झटणाऱ्या कुटुंबांची मानसिकता हे सगळं यात पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. विशेषतः या चित्रपटात महिला सैनिकांची भूमिका केंद्रस्थानी असेल, ज्यामुळे हा चित्रपट केवळ युद्धकथा न राहता प्रेरणादायी सिनेमा ठरणार आहे.
पोस्टरच्या प्रसिद्धीनंतर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेकांनी या कल्पनेचं स्वागत करत चित्रपटासाठी उत्साह व्यक्त केला आहे. मात्र, काही नेटकऱ्यांनी यावर टीकाही केली आहे. काहींनी म्हटलं, 'ऑपरेशन अजून पूर्ण झालेलं नाही, त्यावर इतक्या लवकर चित्रपट बनवणं योग्य नाही.' अशा प्रतिक्रिया लक्षात घेता, निर्मात्यांनी चित्रपटाच्या संवेदनशीलतेचा आदर राखून वास्तवाच्या आधारे मांडणी करण्याचे संकेत दिले आहेत.
'ऑपरेशन सिंदूर' ही मोहीम 7 मे 2025 रोजी रात्रीच्या वेळी अंमलात आणण्यात आली होती. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला. त्या भयानक हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. त्या घटनेनंतर केवळ 15 दिवसांत भारतीय लष्कराने नियोजनबद्ध हल्ला करून पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लष्कराच्या हवाई दलाच्या विशेष पथकाने केवळ 25 मिनिटांमध्ये ही कारवाई केली होती. या कारवाईत लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद यांसारख्या संघटनांच्या ठिकाणांचा समावेश होता आणि अंदाजे 100 पेक्षा अधिक दहशतवादी ठार करण्यात आले होते.
चित्रपटाची अधिकृत स्टारकास्ट, रिलीज होण्याची तारिख आणि ट्रेलरची घोषणा लवकरच केली जाणार आहे. सध्या हा चित्रपट देशभक्तीवर आधारित सिनेविश्वात नवा उत्साह निर्माण करत आहे.