देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या गाडीला अपघात; दोघे ठार

सालपे गावच्या हद्दीतील घटना; सात ते आठजण जखमी

by Team Satara Today | published on : 11 May 2025


लोणंद : इचलकरंजी (ता. हातकणंगले जि. कोल्हापूर) येथून उज्जैन, मध्यप्रदेश येथे महाकाल देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या मिनी ट्रॅव्हल्सचा शनिवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास लोणंद - सातारा रस्त्यावर सालपे (ता.फलटण जि. सातारा) गावच्या हद्दीत अपघात झाला. मिनी ट्रॅव्हल्सला समोरुन आलेल्या ट्रकची जोराची धडक बसून झालेल्या भीषण अपघातामध्ये दोघे जागीच ठार झाले, तर अन्य 7 ते 8 भाविक गंभीर, किरकोळ जखमी झाले आहेत. 

या अपघातानंतर लोणंद पोलीस व स्थानिक नागरिकांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. उज्जैन येथे देवदर्शनासाठी निघालेल्या चालकाचा, भविकाचा या अपघातामध्ये दुर्देवी मृत्यु झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून या घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.

या अपघाताबाबत लोणंद पोलीस स्टेशनमधून मिळालेली माहिती अशी, इचलकरंजी (ता.हातकणंगले जि. कोल्हापुर) येथून उज्जैन मध्यप्रदेश येथे महाकाल देवदर्शनासाठी एक कुटुंब, त्यांचे नातेवाईक असे 15 भाविक ओंकार पाटील यांच्या मालकीच्या मिनी ट्रॅव्हल्स गाडी (क्र. एम.एच 04 सी.पी 2452) मधून निघाले होते. ही मिनी ट्रॅव्हल्स कराड, सातारा मार्गे लोणंदकडे येत असताना शनिवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास लोणंद - सातारा रस्त्यावर सालपे (ता. फलटण) गावच्या हद्दीत लोणंदकडून सातार्‍याकडे जाणार्‍या मालट्रक (क्र.एम.एच 42 बी एफ 7784) ने भरधाव वेगाने येऊन मिनी ट्रॅव्हल्सला जोराची धडक दिली. या भीषण अपघातमध्ये ट्रॅव्हल्स चालक सलमान इम्तीयाज सय्यद (वय 24 वर्षे रा. मालबाग पाटील गल्ली, गणेशनगर शिरढोण ता. शिरोळ जि. कोल्हापूर) ट्रॅव्हल्समधील प्रवासी भाविक रजनी संजय दुर्गुळे (वय 48 वर्षे रा. पेठ वडगाव ता. हातकणंगले जि. कोल्हापूर) या दोघांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. ट्रॅव्हल्स मधील इतर 7-8 भाविक गंभीर व किरकोळ जखमी झाले आहेत. या भीषण अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थ व लोणंद पोलिसांनी जखमींना पुढील उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटल सातारा येथे पाठवले. या अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेचा अधिक तपास लोणंदचे सपोनि सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण या करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
क्षेत्र महाबळेश्वरच्या कोरड्या विहिरीत सापडली पुरातन शस्त्रे
पुढील बातमी
वृद्ध वकिलाच्या घरातून सुमारे साडेसात लाखांचे दागिने लंपास

संबंधित बातम्या