‘जिहे-कठापूर'ला सोडलेले पाणी बंद करा

अन्यथा तीव्र आंदोलन छेडू; धोम धरण पाणी समितीचा थेट इशारा

by Team Satara Today | published on : 27 February 2025


सातारा : धोम धरणातून कृष्णा नदी पात्रात जिहे- कठापूर उपसा सिंचन योजनेसाठी नियमबाह्य सोडलेले पाणी तातडीने बंद करावे, अन्यथा महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशाचा भंग झाल्याने उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल, तद्वतच तीव्र जनआंदोलन करावे लागेल, असा इशारा धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

याबाबत पाणी बचाव संघर्ष समितीने सातारा सिंचन मंडळ, सातारा सिंचन विभाग, सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ आणि जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेच्या प्रमुख अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे, की धोम धरणातून कृष्णा नदीपात्रातून जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेसाठी १५ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणी सोडले आहे. ही माहिती संघर्ष समितीला त्याच दिवशी मिळाली होती; परंतु १७ फेब्रुवारी २०२५ रोजी कालवा सल्लागार समितीची बैठक कोयनानगर येथे झाली. त्यात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर जिहे- कठापूर उपसा सिंचन योजनेबद्दल चर्चा झाली.

या चर्चेदरम्यान या योजनेला आम्ही तीव्र विरोध केलेला होता. त्या वेळी जलसंपदामंत्र्यांनी आम्हाला आपण मार्चमध्ये मुंबई येथे बैठक लावू त्यानंतर पाणी वाटपाबद्दल निर्णय घेऊ, असे आश्वासन दिलेले होते. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केलेली नसून, धोमच्या धरणातून जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेसाठी नियमबाह्य पाणी सोडण्यात आलेले आहे. कृष्णा नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे संपूर्ण धोम लाभक्षेत्रातील सिंचन व्यवस्था बाधित होणार असून, उभ्या पिकांचे नुकसान होऊन शेतकरी अडचणीत येणार आहे.

तसेच धोम प्रकल्प अहवाल व कृष्णा नदीवरील उपसा सिंचन योजना प्रकल्प अहवालानुसार अशाप्रकारे नदीपात्रात धरण साठ्यातून पाणी सोडण्याची कोणतीही तरतूद नाही. मागील पावसाळ्यात धोम धरणातून ४.६९ टीएमसी पाणी सोडलेले आहे. त्यामुळे आज मितीस धोम धरणातील साठ्यामधून पाणी देय नाही, याची नोंद घ्यावी. हे निवेदन जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनीही माहितीसाठी पाठवण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अंधश्रद्धामुक्त समाज घडवणारे काम केले पाहिजे : ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर
पुढील बातमी
महाशिवरात्री जागरण सोहळा उत्साहात संपन्न

संबंधित बातम्या