कृष्णा कारखान्यात ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे, त्याचा पै अन् पै वसूल केल्याशिवाय गप्प राहणार नाही - विजयी सभेत आमदार डॉ. अतुल भोसले यांचा इशारा

by Team Satara Today | published on : 24 June 2026


कराड : वाघाचे  कातडे पांघरूण कोणी वाघ होऊ शकत नाही. वाघ व्हायला वाघाचे काळीज लागते. कृष्णा कारखान्यात ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे, त्याचा पै अन् पै वसूल केल्याशिवाय गप्प राहणार नाही, असा इशारा आमदार डॉ. अतुल भोसले यांनी दिला.

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मतमोजणीच्या पहिल्या फेरीत जवळपास आठ हजाराचे मताधिक्य मिळाल्यानंतर रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथे सायंकाळी चारच्या सुमारास कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी डॉ. सुरेश भोसले, आमदार डॉ. अतुल भोसले व कृष्णा विश्व विद्यापीठाचे संचालक विनायक भोसले यांच्यासह विजयोत्सव साजरा झाला.

यावेळी झालेल्या विजयी सभेत अतुल भोसले म्हणाले, कारखान्याच्या सभासदांना व्यासपीठावरती न घेता जे सभासद नाहीत त्यांचा पाठिंबा घेऊन प्रचार केला गेला. जे सभासद नाहीत त्यांनी आमच्यावर टीका केली. अशा गोष्टीने फरक पडत नाही, पण दिवंगत जयवंतराव आप्पांच्याविषयी बोलण्याची त्यांची पात्रता आहे का? ज्या लोकांनी आमच्या कुटुंबावरती टीका केली त्यांच्याविषयी मला राग नाही, पण ज्यांनी करायला लावली त्यांचा योग्य बंदोबस्त केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. राजकारणाच्या कुस्तीत त्यांना माफी नाही.

सुरेश भोसले म्हणाले, एक वेळ अपघाताने निवडून आलेल्या लोकांनी खोट्या वल्गना व खोटी आश्वासने देऊन मते मिळवण्याचा प्रयत्न केला, पण सुज्ञ सभासदांनी आमच्या पारदर्शक कामकाजावरती विश्वास ठेवून आम्हाला प्रचंड मताधिक्य दिले आहे. सभासदांनी जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासात पात्र राहण्याची जबाबदारी आमची आहे. येत्या काळात यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना हा महाराष्ट्रात एक नंबरवर नेण्याचा आमचा प्रयत्न राहील.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
हॉटेलमध्ये ग्राहकांना पिण्याचे पाणी मोफत देणे बंधनकारक; नियम मोडल्यास कारवाई - तुकाराम मुंडेंचा आदेश
पुढील बातमी
कोल्हापूर विभागातील नऊ शेतकऱ्यांना शासनाचे कृषी पुरस्कार; सातारा जिल्ह्यातील चौघांचा समावेश

संबंधित बातम्या