पाटण तालुक्यातील वाझोली-डाकेवाडी रस्त्यावर दरडी कोसळल्या

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

by Team Satara Today | published on : 22 August 2024


पाटण : पाटण तालुक्यातील काळगाव खोऱ्यातील अनेक दुर्गम गावांना जोडणाऱ्या वाझोली-डाकेवाडी दरम्यानच्या रस्त्यावर जोराच्या पावसामुळे रस्त्यावर सतत दरडी कोसळत आहेत. पावसाच्या पाण्यामुळे दरडीबरोबरच पाण्याच्या प्रवाहामुळे डोंगरातून मोठे दगडही वाहून रस्त्यावर येत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

वाझोली गावाजवळच्या डोंगरावर मोठमोठे दगड आहेत. डोंगरावरील हे दगड कधीही गावावर कोसळतील, अशी स्थिती निर्माण झाली आहे. या परिसरातील लोक भयभीत झाले आहेत. विभागाला दोन दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात पावसाने झोडपून काढले होते. कमी वेळामध्ये जोरदार पाऊस झाल्याने नदी नाले आणि ओढ्याच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे.

अनेक दुर्गम डोंगराळ गावांना जोडणाऱ्या वाझोली, डाकेवाडी दरम्यानच्या रस्त्यावर कुमकवत झालेल्या दरडी पावसामुळे कोसळत आहेत. डोंगराचा भाग गावाच्या खाली असल्याने डोंगरातून पाण्याच्या प्रवाहामुळे दरडीबरोबरच इतर दगडही रस्त्यावर येत आहेत. वाझोली गावातून निवी, कसणी, निगडे, घोटील अशा अनेक दुर्गम वाड्या-वस्त्यांना हा रस्ता उपयुक्त आहे.

वाझोली गावाजवळच्या डोंगरावरील भलेमोठे दगड लोकवस्तीत कोसळण्याच्या भीतीने येथील ग्रामस्थांची झोप उडवलेली आहे. दरड कोसळल्याच्या प्रकाराने त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी पोलिस पाटील विजय सुतार यांनी तहसीलदार अनंत गुरव यांनी या घटनेची माहिती दिली. तहसीलदारांनी तातडीने बांधकाम विभागाला पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
यशराज फिल्मसने केली 'मर्दानी-3' ची घोषणा
पुढील बातमी
सुनीता विल्यम्स आणि विल्मोर मर्यादित 96 तासांच्या ऑक्सिजनसह अंतराळात अडकण्याची शक्यता 

संबंधित बातम्या