सातारा, दि. १० : युरोप खंडातील माऊंट एलबुस हे 18 हजार 510 फूट उंचीचे सर्वोच्च शिखर सर करणाऱ्या सातारच्या 13 वर्षीय धैर्या विनोद कुलकर्णी हिचा रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे जिद्द पुरस्काराने गौरव केला जाणार आहे.
पुरस्कार वितरण समारंभ शनिवार, दि. 13 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. पुरस्काराचे वितरण शिखर बँकेचे अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी अध्यक्षस्थानी तर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती असणार आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे दिली.
सन्मानपत्र व भेटवस्तू असे पुरस्काराचे स्वरूप असून कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, तरी या पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.