माण तालुक्यात दुष्काळाची दाहकता तीव्र; वळीवाचा पाऊस न झाल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या रखडल्या, टँकरची संख्या वाढू लागली

by Team Satara Today | published on : 16 June 2026


दहिवडी : माण तालुक्यात मान्सूनपूर्व वळीवाच्या पावसाने पूर्णतः दडी मारल्याने दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. तालुक्यातील अनेक विहिरींनी तळ गाठला असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. परिणामी तब्बल ४८ गावे आणि २८५ वाड्यावस्त्यांमधील ६७ हजारांहून अधिक नागरिक तसेच ९१ हजारांपेक्षा जास्त पशुधन सध्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे.

हस्तनपूर गावात सहा दिवसांपासून पाणी न आल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली असून पाणीपुरवठ्याबाबतच्या तक्रारी वाढत आहेत. शासनाच्या निकषानुसार नागरिक व पशुधनाला पुरेसे पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक असताना काही भागांत पाण्यासाठी अजूनही प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील दहिवडी, बिजवडी, पाचवड, पांगरी, येळेवाडी, मोगराळे, वडगाव, जाधववाडी, तोंडले, शिंगणापूर, अनभुळेवाडी, थदाळे, मोही, दानवलेवाडी, हस्तनपूर, डंगिरेवाडी, वावरहिरे, संभुखेड, कारखेल, वरकुटे-म्हसवड, पर्यंती, धळूदेव, पळशी, पिंगळी बुद्रुक, पिंगळी खुर्द, माडी, इंजबाव, खटुबाव, भालवडी, पानवण, विरळी, शिरवली, वारुगड, कुळकजाई, सत्रेवाडी, उकिडवे, कोळेवाडी, परकंदी, शिंदी बुद्रुक, टाकेवाडी, सरूपखानवाडी, पांढरवाडी, कुकुडवाड, दोरगेवाडी, पुकळेवाडी, चिलारवाडी आणि वळई या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.


गावठाणांसह गोसावीवस्ती, पवारवस्ती, शेलारवस्ती, बोराटेवस्ती, गोडसेवस्ती, काकाची वस्ती, खंडोबावस्ती, निंबाळकर वस्ती, खरातवस्ती, रामोशीवाडी, घोडेवाडी, गडवस्ती, कापूसवाडी, माळवाडी, मोटेवाडी, ढवळेवस्ती, जांभळीचा मळा, शिवाजीनगर, धनवडेवाडी, आगासवाडी यांसह २८५ वाड्यावस्त्यांपर्यंत टँकरची धाव सुरू आहे. काही ठिकाणी दिवसाआड तर काही भागांत दिवसाला दोन ते तीन खेपा कराव्या लागत आहेत. पशुधनालाही टँकरचाच आधार आहे. माण तालुक्यातील दुष्काळाची भीषणता पशुधनाच्या स्थितीतूनही स्पष्ट होत आहे. पिंगळी खुर्द, टाकेवाडी, संभुखेड, इंजबाव, पळशी, परकंदी, विरळी आणि कुकुडवाड परिसरात जनावरांसाठी स्वतंत्र टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. पाण्याअभावी जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

पावसाची अन् टँकरचीही प्रतीक्षा 

माण तालुक्यातील हजारो कुटुंबांचे आजचे वास्तव म्हणजे पावसाची प्रतीक्षा आणि टँकरची वाट पाहणे झाले आहे. विहिरींचे तळ उघडे पडले आहेत, शेतातील कामे ठप्प झाली आहेत आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनत आहे. दमदार पाऊस लवकर न झाल्यास टंचाई आणखी भीषण होण्याची शक्यता असून ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण आहे. पेरण्या खोळंबल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दुष्काळाचे पडसाद आता स्पष्टपणे दिसू लागले असून प्रशासनासमोर पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. निसर्गाची अवकृपा झाली असली तरी प्रशासन दारोदारी जाऊन पाणी पुरवठा करत आहे. टँकरमुळे सध्या तरी जीवन सुसह्य झाले आहे.

पेरण्या खोळंबल्या; जनावरे विकण्याची वेळ

वळीवाचा पाऊस न झाल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या रखडल्या आहेत. मान्सूनही अपेक्षेपेक्षा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. चारा व पाण्याच्या टंचाईमुळे अनेक शेतकरी जनावरे विकण्याच्या तयारीत असून, परिस्थिती अशीच राहिल्यास येत्या काळात गुरांच्या छावण्या सुरू करण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वेण्णा लेकच्या पाण्याची पातळी कमालीची खालावली; केवळ 50 ते 52 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा, पाऊस लांबल्यास काय होणार?
पुढील बातमी
महाबळेश्वर येथील ‘गोल्‍फ कोर्स’ वृक्षतोड, उत्खननप्रकरणी चेअरमन, सचिव आणि मेढा येथील एका ठेकेदावर फौजदारी गुन्‍हा

संबंधित बातम्या