सातारा : बॉम्बे रेस्टॉरंट ते देगाव फाटा रस्त्यावर झालेल्या अपघातातील जखमीचा उपचारावेळी मृत्यू झाला. अतिक फारुख शेख (वय ५१, सध्या रा. आनंदग्रीह सोसायटी, सारखळ फाटा ता.सातारा) असे त्यांचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. ३ डिसेंबर रोजी अतिक शेख हे दुचाकीवरुन जात असताना मिक्सर (बांधकामासाठी वापरले जाणारे वाहन) असलेल्या ट्रकची धडक बसली. या घटनेत शेख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना उपचारासाठी सातार्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पंचनामा करण्यात आला. पोलिस याचा तपास करत आहेत. शेख यांच्यावर उपचार सुरु असताना शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबियांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आक्रोेश केला. अतिक शेख हे महामार्गालगात एका शोरुममध्ये कामाला होते. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.