सातारकरांच्या बळावर पुढच्या वर्षी साताऱ्यात परिवर्तनाची दहीहंडी फोडू - प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, साताऱ्यात राष्ट्रवादीची दहीहंडी उत्साहात

by Team Satara Today | published on : 09 September 2026


सातारा : मी दहीहंडीच्या पथकातील थरावर उभा राहणारा कार्यकर्ता असून दहीहंडी फोडण्यात मी वाकबगार आहे. पायाखालचा थर मजबूत असेल तर वरची दहीहंडी नक्की फुटते. त्यामुळे साताऱ्यात परिवर्तनाची दहीहंडी फोडायची असेल तर त्यासाठी वेगळी लढाई उभारावी लागेल. सातारकरांच्या बळावर पुढच्या वर्षी साताऱ्यात परिवर्तनाची दहीहंडी फोडू आणि या परिवर्तनाची मशाल महाराष्ट्रभर नेऊ, असा सूचक इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यात दिला.
साताऱ्यात आयोजित दहीहंडी सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अभयसिंह जगताप, सुवर्णाताई पाटील, राजकुमार पाटील, सुनील काळेकर, गोरखनाथ नलावडे, समीर घाटगे, प्रवीण धसके, विक्रमसिंह फडतरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शशिकांत शिंदे म्हणाले, साताऱ्यात दहीहंडी सोहळ्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच राष्ट्रवादीची तुतारी वाजली आहे. ही केवळ दहीहंडी नसून स्वाभिमानाची आणि निष्ठेची दहीहंडी आहे. आता हीच दहीहंडी परिवर्तनाची दहीहंडी ठरणार आहे. व्यवस्थेला हादरवणारी दहीहंडी फोडायची असेल तर तिचे थरही मजबूत असले पाहिजेत.
देशातील आणि राज्यातील युवक आपल्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या संघर्षातून परिवर्तनाची ताकद दिसून येत आहे. साताऱ्यातही हीच क्रांतीची मशाल पेटवायची आहे. सातारकरांनी लोकसभेच्या निवडणुकीत माझ्यावर विश्वास दाखवला. संधी मिळाली तर इतिहास घडवता येतो, हे साताऱ्याने दाखवून दिले आहे. पुढच्या वर्षी मुंबईहून नऊ थरांचे गोविंदा पथक साताऱ्यात आणू. 'जय जवान गोविंदा' पथकात मी मुंबईत काम केले आहे. दहीहंडी फोडण्यात मी वाकबगार आहे. आता परिवर्तनाची हंडी फोडण्याचा इतिहास घडवून तो महाराष्ट्रभर नेऊया, असे आवाहन त्यांनी केले.
अभयसिंह जगताप म्हणाले, सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. मी मूळचा साताऱ्यातील रहिवासी असून रविवार पेठेत माझे घर आहे. त्यामुळे यापुढे साताऱ्यातील प्रत्येक राजकीय घडामोडीवर माझे बारीक लक्ष राहणार आहे.
शशिकांत शिंदेंनी सांगितले दहीहंडीचे पाच थर
साताऱ्यात परिवर्तनाची दहीहंडी फोडायची आहे. त्यासाठी भ्रष्टाचाराविरोधातील पहिला थर, पेपरफुटीविरोधातील दुसरा थर, विकासाच्या दृष्टीचा तिसरा थर, बेरोजगारीविरोधातील चौथा थर आणि हुकूमशाहीविरोधातील पाचवा थर मजबूत असला पाहिजे. साताऱ्यातील युवकांनी अन्यायाविरोधात उभे राहण्याची गरज आहे, असे शशिकांत शिंदे यांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा बँकेच्या मतदार यादीवरील ४९ हरकतींचा निपटारा; आता अंतिम मतदार यादीकडे सर्वांचे लक्ष
पुढील बातमी
जंगल शांत आहे म्हणून वाघ नाही, असे समजू नका; डिवचाल तर भारी पडेल : ना. शिवेंद्रराजे, मेढयातील डरकाळीने राजकीय वातावरण तापले

संबंधित बातम्या