सातारा : शहराच्या पश्चिम भागात पावसाने दमदार पुनरागमन केले. सुमारे अर्धा ते पाऊण तास कोसळलेल्या जोरदार सरींमुळे वातावरणात गारवा पसरल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.
दुपारच्या सुमारास अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसादरम्यान अनेकदा विजांचा मोठा आवाज झाल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांना सावधगिरीने प्रवास करावा लागला.
मात्र सुमारे पाऊण तासानंतर पावसाने उघडीप दिली आणि पुन्हा एकदा ऊन पडले. या पावसामुळे शहराच्या पश्चिम भागातील शेतकरी आणि नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असून खरीप हंगामासाठीही हा पाऊस उपयुक्त ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान वारंवार होणार्या जोराच्या मेघगर्जनेमुळे हा पाऊस नक्की मान्सूनचा की मान्सून पूर्व म्हणजेच अवकाळी आहे, असाच प्रश्न सातारकरांना पडला आहे.
या पावसामुळे जिल्ह्यात साजर्या होणार्या वटपौर्णिमेच्या व्रत सणासाठी लागणारे पूजा साहित्य खरेदी तसेच शालेय खरेदीसाठी बाहेर पडलेल्या महिलांना आडोसा गाठावा लागला. अनेक आंबा विक्रेते तसेच पूजा साहित्य विक्रेत्यांना आडोसा घ्यावा लागला. या पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. जोरदार पडणार्या पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर विशेष करून उतार भागांमध्ये पाण्याचे लोट वाहताना दिसत होते. तसेच राजवाडा, राधिका रोड, नगरपालिका चौक येथे पाण्याची मोठी तळी साचलेली दिसून आली. दमदार पावसाचे सरी पडल्यामुळे सातारकरांनी निश्चिंततेचा सुस्कारा सोडला आहे.
कास धरणातून होणारा पिण्याचा पाणीपुरवठा पातळी खालवल्यामुळे अनेक भागात कमी प्रमाणात केला जात आहे. मात्र या दमदार पावसामुळे पाण्याची पातळी सुधारेल अशी अपेक्षा आहे. 3 दिवस पावसाने दडी मारल्यानंतर झालेल्या या दमदार सरींमुळे शहरातील वातावरण प्रसन्न झाले असून, पुढील काही दिवसांतही पावसाचा जोर कायम राहील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. उशिरा का होईना परंतु सुरू झालेल्या या पावसामुळे आता शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग येणार असून अनेक ठिकाणी खोळंबलेल्या पेरण्यानाही सुरुवात होईल.