कराड : रंगाची वॉलपुट्टीचे साहित्य घेऊन निघालेल्या ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव ट्रक येथील भेदा रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीवर आदळला. भिंत तोडून ट्रक रुग्णालयाच्या पायऱ्यापर्यंत गेल्याने ट्रकखाली दोन दुचाकींचा चक्काचूर झाला. संरक्षक भिंतीचेही नुकसान झाले आहे. यात ट्रकचालक किरकोळ जखमी झाला असून, अपघातात सुमारे दोन लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी टळली.
कराड ते तासगाव रस्त्यावर रात्री बाराच्या सुमारास हा अपघात झाला. भिंतीमुळे ट्रक अडकून राहिल्याने तो रुग्णालयात न गेल्याने दुर्घटना टळली. हनुमंत भारत ढोले (वय ३५, रा. कायापूर, जि. धाराशिव) असे ट्रक चालकाचे नाव आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिस व घटनास्थळावरील माहिती अशी, तासगावहून रंगासाठी लागणारी वॉलपुट्टी घेऊन ट्रक (एमएच १५ एफव्ही ६७६९) विट्याकडे निघाला होता. ट्रक कार्वे नाका येथे आल्यानंतर त्याच्या ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. त्याही स्थितीत तो ट्रक घेऊन भेदा चौकापर्यंत आला.
मात्र, भेदा चौकातील कोल्हापूर नाक्याकडे जाणाऱ्या वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे चौकात रस्त्यानजीकच्या भेदा रुग्णालय ट्रक शिरला. रुग्णालयाची संरक्षक भिंत तोडून आतील दोन दुचाकींवरून ट्रक पायऱ्यापर्यंत आला. अपघातानंतर चालक ट्रक तेथेच सोडून पसार झाला. उपनिरीक्षक मारुती चव्हाण यांच्यासह पथकाने आज सायंकाळी ट्रकचालक हनुमंत ढोलेला ताब्यात घेतले. तो जखमी झाला आहे.