सातारा : गोडोली येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक पूर्णत्वाच्या वाटेवर आहे. परंतु स्मारकाच्या परिसरात असलेल्या समृध्दी हाईटसमधील अमेय भरत मोहिते यांच्या हॉटेल मोहिते एम्पायर मध्ये दारुच्या दुकानासाठी परवानगी मिळावी याबाबत अर्ज करण्यात आला आहे. ही परवानगी देऊ असे म्हणणे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालयाकडे नोंदवले आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे हा अर्ज येणार आहे. त्यांनी हा अर्ज मंजूर करु नये अशी मागणी सामाजिक, माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. तसेच अर्ज मंजूर झाल्यास न्यायालयीन लढा लढण्याचा इशाराही निवेदनात श्री.मोरे यांनी दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात, सातारा नगपालिकेच्या हद्दीतील गोडोली तळे येथे धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा लवकरच बसवण्यात येणार आहे. हे स्मारक व्हावे यासाठी विविध संघटना, शिवशंभू प्रेमींना पाठपुरावा केला आहे. त्यानंतर आता हे स्मारक अंतिम टप्प्यात आहे. परंतु मोहिते यांचे नावे हॉटेल मोहिते एम्पायर, समृध्दी हाईटस गोडोली येथे दारूच्या दुकानाच्या परवानगीचा प्रस्ताव अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सातारा यांच्या कार्यालयाकडे आला आहे.
याबाबत आम्ही तक्रारी केल्या असल्याने आमचे जाब जबाब घेण्यात आले आहेत. आम्ही याबाबत तीव्र नाराजी, लेखी हरकती जबाब दिले आहेत. हा अर्ज मंजूरीसाठी आपल्याकडे येणार आहे. हा अर्ज मंजूर करताना वरील सर्व बाबींचा सखोल तसेच समृध्दी हाईटस्मधील नागरिक सभासद यांचे हिताचा विचार करावा. तरी सुध्दा हा अर्ज मंजूर केल्यास नाईलाजास्तव लोकहितार्थ न्यायालय लढाई लढावी लागेल, असा इशाराही श्री. मोरे यांनी दिला आहे.यावेळी समृद्धी हईट्स येथील वंदना कडुकर, हेमंत निकम, सुवर्णा किर्दत, सुनील बोराटे व इतर सदस्य तसेच गोडोली ग्रामस्थ उपस्थित होते.