सातारा : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घरातून चोरीस गेलेली दोन लाख 85 हजार रुपये किमतीची सोन्याची मोहनमाळ हस्तगत करण्यात वाठार पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रशांत हिम्मत जगताप (वय 32) आणि त्याची पत्नी (दोघेही रा. वडगाव, ता. फलटण, जि. सातारा) यांना अटक केली आहे. सलग पाच दिवस गोपनीय माहितीच्या आधारे तपास करून पोलिसांनी या चोरीचा छडा लावला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात ते 26 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान एका राहत्या घरातून दोन तोळे वजनाची सोन्याची मोहनमाळ चोरीस गेली होती. या दागिन्यांची किंमत दोन लाख 85 हजार रुपये होती. याप्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वाठार पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सलग पाच दिवस आरोपींचा शोध घेतला. पोलिसांना चकवा देत पुणे ग्रामीण परिसरात फिरणार्या संशयितांची माहिती मिळाल्यानंतर पथकाने त्यांचा माग काढला. त्यानंतर प्रशांत जगताप आणि साक्षी जगताप या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. या गुन्ह्यात चोरीस गेलेली दोन तोळे वजनाची सोन्याची मोहनमाळ त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आली.
दिवाळीच्या सणाच्या काळात घरातून चोरीस गेलेले दागिने पुन्हा मिळाल्याने तक्रारदाराने भावनिक समाधान व्यक्त केले. तसेच वाठार पोलिसांचे आभार मानले. सणासुदीच्या काळात झालेल्या चोरीचा अल्पावधीत छडा लावत संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केल्याने वाठार पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव आणि कोरेगाव विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले, पोलीस उपनिरीक्षक गहिनीनाथ सातव, पोलीस उपनिरीक्षक नितीन भोसले, पोलीस हवालदार उदय जाधव, धीरज यादव, जितेंद्र शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल काळे, प्रतीक देशमुख आणि एकनाथ सरगर यांनी ही कारवाई केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार धीरज यादव करीत आहेत.
दिवाळीत वाठार पोलिसांची दमदार कामगिरी; 2.85 लाखांची चोरीप्रकरणी दांम्पत्यास अटक; दोन तोळ्यांचे सोन्याचे दागिने हस्तगत
by Team Satara Today | published on : 07 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा