सातारा- तमाम मराठी मनाची अस्मिता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! दिवाळीच्या औचित्याने शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गड- किल्ल्यांची प्रतिकृती उभारून अनेक मावळे शिवरायांच्या इतिहासाला उजाळा देत असतात. अशा मावळ्यांचा हा उपक्रम आणि त्यांचा सन्मान म्हणजे आदर्श शिवविचारांचा प्रचार आणि प्रसार होय, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनीम बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
कलर्स सोशल फाउंडेशन, निर्मिती प्रतिष्ठान, रंगप्रवाह नाट्य संस्था आणि ईम्रान मोमीन मित्र समूह सातारा यांच्या वतीने भव्य किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्यांना ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करून त्यांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी ना. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ईम्रान मोमीन, संस्थेचे मार्गदर्शक अमर मोकाशी, इरफान शेख, निलेश कुलकर्णी, अख्तर शेख, रितेश नांगरे पाटील, मनीष काशीद, नियती पवार, प्रथमेश देवकर, मनाली कदम, रमेश जाधव, संदेश बांदल, अमित काळे आदी उपस्थित होते.
स्पर्धेत मोठ्या गटात विश्वकर्मा नवतरुण मित्रमंडळ आंबवडे बु. (पन्हाळा किल्ला) यांनी प्रथम क्रमांक, मावळा प्रतिष्ठान मित्रमंडळ आंबवडे बु. (सिंहगड) द्वितीय क्रमांक तर, धर्मवीर प्रतिष्ठान आंबवडे बु. (पन्हाळा) यांनी तृतीय क्रमांक पटकावला. लहान गटात शिवसंकल्प मित्र समूह गुरुवार पेठ सातारा (सिंहगड) यांनी प्रथम, अमित काळे यशवंत हॉस्पिटल समोर सातारा (सिंधुदुर्ग) यांनी द्वितीय तर, आर्यन साळुंखे बुधवार नाका सातारा (प्रतापगड) याने तृतीय क्रमांक पटकावला. या सर्वांना ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी सन्मानित करून शुभेच्छा दिल्या. तसेच आयोजकांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.