करवाढ नसलेले सातारा पालिकेचे 645 कोटी 95 लाख रुपयांचे बजेट सादर

महसूल वाढीचा प्रशासनाकडून प्रयत्न

by Team Satara Today | published on : 27 February 2025


सातारा : सातारा पालिकेने यंदाही सातारकरांना दिलासा दिला आहे. कोणतीही करवाढ नसलेले आणि अनेक विकास कामांचा अंतर्भाव असलेले 642 कोटी 95 लाख 45हजार रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक सातारा पालिकेच्या लेखा विभागाकडून सादर करण्यात आले. पालिकेच्या प्रशासकीय सभेत प्रशासक अभिजीत बापट यांच्या अध्यक्षतेखाली लेखा विभागाचे वरिष्ठ लिपिक भालचंद्र डोंबे यांनी हे बजेट सादर केले. गेल्या तीन महिन्यापासून सातारा पालिकेकडून बजेटची तयारी सुरू होती. सातारा पालिकेचे बजेट गुरुवारी पालिकेच्या प्रशासकीय सभेत छत्रपती शिवाजी सभागृहाच्या दालनात सादर करण्यात आले.

 या सभेसाठी अतिरिक्त मुख्याधिकारी ऐश्वर्या निकम, लेखा विभागाचे वरिष्ठ लिपिक भालचंद्र डोंबे, सभा विभाग प्रमुख अतुल दिसले, नियंत्रण अधिकारी दिलीप चिद्रे, नगर रचनाकार एस. एस. मोरे तसेच पालिकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. बजेटचे वाचन लेखा विभागाच्या वतीने करण्यात आले.

 यामध्ये मालमत्ता कर 22 कोटी रुपये, पाणीकर आठ कोटी, विषय स्वच्छता कर साडेतीन कोटी, अग्निशमन कर 85 लाख, इमारत भाडे व खुल्या जागांचे भाडे दोन कोटी 85 लाख, हातगाडा परवाना फी 35 लाख रुपये, नाट्यगृह भाडे दहा लाख, विकास कर पाच कोटी, प्रीमियम दहा कोटी रुपये, मंडई फी आठ लाख रुपये, महसुली अनुदाने 48 कोटी तीन लाख रुपये,भांडवली अनुदाने 399 कोटी साठ लाख रुपये, पंतप्रधान आवास योजना लाभार्थी 14 कोटी रुपये, थकीत घरपट्टी व विलंबाकार पाच कोटी अशी मांडणी (2025 -26 )बजेटची करण्यात आली. एकूण महसुलाचा आकडा वाढला असला तरी विकास कामांच्या भांडवली अनुदानाची चलती अंदाजपत्रकात दिसून आली. तब्बल 400 कोटी रुपये हे अनुदानापोटी पालिकेला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे यंदाच्या बजेटने हद्दवाढ आणि इतर क्षेत्रात सुरुवातीला विकास कामांमुळे सहाशे कोटीचा आकडा ओलांडला आहे.

पालिकेच्या उत्पन्न व खर्च दोन्ही बाजूचा विचार करता उत्पन्नाच्या बाजूने नगरपरिषद कर सात रुपये, वसुली अनुदाने दहा रुपये, भांडवली अनुदान साठ रुपये, नगरपरिषद मालमत्ता फी तीन रुपये, व्याज विलंब आकार एक रुपया, इतर उत्पन्न चार रुपये, ठेवी नऊ रुपये, कर्ज सहा रुपये, तर खर्चाच्या बाजूने आस्थापना प्रशासकीय खर्च 13 रुपये, मालमत्तांची दुरुस्ती देखभाल एक रुपया, व्यवहार खरेदी सहा रुपये, अंशःदाने अनुदान एक रुपया, विकास कामे सत्तर रुपये, संकीर्ण खर्च एक रुपया व असाधारण कर्ज आठ रुपये अशी मांडणी करण्यात आली आहे.

सातारा नगर पालिकेच्या यंदाच्या अंदाजपत्रकाची वैशिष्ट्ये सांगताना मुख्याधिकारी म्हणाले, नगरपालिकेला यंदा वसुंधरा अभियानांतर्गत 16 कोटी रुपये बक्षीस मिळाले. त्यामुळे आरोग्य कर्मचार्‍यांना मागील आर्थिक वर्षात एक वाढीव वेतन वाढ देण्यात आली आहे. सेवानिवृत्त कर्मचारी व विद्यमान कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची पूर्ण रक्कम देण्यात आली आहे. सातारा शहराचा कार्बन उत्सर्जन आराखडा संपूर्ण तयार आहे. 2040 पर्यंत सातारा शहर कार्बन न्यूट्रल सिटी बनवण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जाणार आहेत. कास धरणाची उंची वाढवणे, सातारा नगरपालिकेला वीज निर्मिती स्वयंपूर्ण बनवण्याच्या दृष्टीने दीड मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प अंतिम टप्प्यात असून तो कार्यान्वित करणे, एसटीपी जलशुद्धीकरण प्रकल्प ऑटोमेशन पथदिवे इत्यादी सुविधा दिल्या जात आहेत. यामुळे सातारा पालिकेची विद्युत बिलावरील पाच कोटींची बचत होणार आहे.

पर्यावरण समतोलासाठी 2025 पर्यंत शहरात किमान 50 उद्यानांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पेढ्याचा भैरोबा परिसर विकसन, महादरे तलाव बळकटीकरण, रांगोळे कॉलनी, फॉरेस्ट कॉलनी, निसर्ग कॉलनी, अजिंक्य कॉलनी, मुथा कॉलनी, नालंदा नगर, या यादोगोपाळ पेठ, हुतात्मा स्मारक येथे उद्यान विकसनाची कामे सुरू आहेत. सातारा पालिकेच्या वाहतूक विभाग सक्षम करण्याच्या दृष्टीने दोन टिप्पर पाणीपुरवठा विभागासाठी दोन पाणी टँकर अतिक्रमण विभागासाठी दोन पिकप व्हॅन, रोड स्वीपिंग मशीन, तीन जेटिंग मशीन शहराच्या सेवेत दाखल झाले आहेत. शासनाकडून एक घंटागाडी तर चार फायर बुलेट प्राप्त झाले आहेत पाणीपुरवठा विभागासाठी छोटे टँकर व इतर वाहन खरेदीसाठी एक कोटी 20 लाख रुपयांची तरतूद आहे.

सातारा पालिकेने माय सातारा हे मोबाईल ऍप 19 फेब्रुवारीपासून सुरू केले आहे. यामुळे नागरिकांना घरबसल्या विविध कर भरणे, मालमत्ता स्वयं मूल्यांकन करणे, करविषयक सेवा तक्रार दाखल करणे, वृक्ष परवाने, जाहिरात फलक इत्यादी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. या सेवांसाठी नागरिकांना 1800, 570 व 30 40 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. मार्च 2025 पासून व्हाट्सअप चॅटबॅट सुरू केला जाणार आहे. महिला व बालकल्याण, दिव्यांग कल्याणकारी योजना याकरिता 56 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नगरपालिकेने यंदा शिवतीर्थ राष्ट्रीय महामार्गावरील तीन उड्डाणपूलांचे सुशोभिकरण, किल्ले अजिंक्यतारा रस्ता सुधारणा, शहीद कर्नल संतोष महाडिक स्मारक व उद्यान इत्यादी कामे पूर्णत्वाला नेली आहेत. 2024-25 या काळात गोडोली तलाव येथील श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारणे, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करणे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसराचे सुशोभीकरण, शिवतीर्थ येथे छत्रपती शिवरायांचा 25 फुटाचा पुतळा बसवणे ही कामे युद्ध पातळीवर सुरू करण्यात येणार असून ती पूर्णत्वाला जाणार आहेत. चौपाटीचे स्थलांतरण आणि सेंट्रल पार्क च्या माध्यमातून त्याचे पुनर्वसन, व्यापारी गाळे आस्थापना, खाजगी संस्था यांना डस्टबिनची सक्ती व डस्टबिन न बाळगणार्‍या आस्थापनेवर कारवाई करण्याची सक्ती केली जाणार आहे. शाहूपुरी येथील चोरगे माळावर अडीचशे आसनांचे दुसरे नाट्यगृह लवकरच उभारले जाणार असून शासनाने जर परवानगी दिली तर सातारा शहर बस सेवा चालवायला सातारा पालिका सक्षम आहे, असे अभिजीत बापट यांनी सांगितले.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
पुढील बातमी
आत्मनिर्भरतेतून विकसित भारताकडे नेणारा अर्थसंकल्प

संबंधित बातम्या