सातारा / प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या साताऱ्यातील कार्यक्रमासाठी तब्बल ४०० एसटी बसचे बुकींग केल्याने दोन हजार फेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे प्रवाशी, वृध्द, ग्रामीण भागातील लोकांना त्रास झाला. पर्यायाने शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. याला जबाबदार कोण? असा सवाल करत शिवसेनेने (उध्दव ठाकरे गट) येथील बसस्थानकाच्या द्वारावर आंदोलन केले.
सातारा शहरात १० दिवसांपूर्वी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून हजारो महिला आणण्यात आल्या. त्यांच्यासाठी सुमारे ४०० एसटी बस आरक्षित केल्या. दोन हजार बस फेऱ्या रद्द झाल्या. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशीच रक्षाबंधनाचा सण होता. त्यासाठी बहिणी भावाकडे जाण्यासाठी निघाल्या होत्या. एसटींच्या फेऱ्या रद्द केल्याने त्यांची गैरसोय झाली. राज्य परिवहन महामंडळाने कोणतीही पूर्व माहिती न देता फेऱ्या रद्द केल्या. यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले, अशी टीका आंदोलकर्त्यांनी केली.
आंदोलन सातारा मध्यवर्ती बसस्थानकाच्या गाड्या बाहेर पडण्याच्या गेटवर करण्यात आले. जवळपास २० मिनिटे हे आंदोलन सुरू होते. यामुळे एका मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अनेक वाहने रस्त्यात अडकून राहिल्याने दुपारी वाहतूक ठप्प झाली. सातारा आगारातील अधिकाऱ्यांनीही आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर आंदोलन थांबवले. तसेच न्याय न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी दिला. यावेळी सागर रायते, सुनील पवार, रवी भणगे, रुपेश वंजारी, प्रणव सावंत, इम्रान बागवान, आरिफ शेख, अमोल गोसावी, सागर धोत्रे, सचिन जगताप, अनिल गुजर, हरि पवार, तेजस पिसाळ, अजय सावंत, अक्षय वाघमारे, नीलेश चव्हाण, किशोर साळुंखे, फिरोज बागवान, आझाद शेख, परवेज शेख, सुभाष पवार, आनंद देशमुख, जयसिंग कांबळे, हेमंत भोईटे, पप्पू ननावरे, सुनील मोहिते, राजेंद्र जगताप, समीर पठाण, लाला कांबळे आदींसह आंदोलक उपस्थित होते.