सातारा : शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने दोन स्वतंत्र चोरी प्रकरणांचा सखोल तपास करून दोन अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लाख 70 हजार रुपये किंमतीचे सुमारे अडीच तोळे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
अबू हसन जीवा इराणी वय 43 रा. निरा, ता. पुरंदर जि. पुणे आणि रजा मास्तर इराणी वय 55, रा. किर्लोस्करवाडी, पलूस ता. पलूस, जि. सांगली अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूपुरी पोलीस ठाण्यात 25 जून रोजी चोरीची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार गुन्हाही दाखल करण्यात आला. त्या अनुषंगाने शाहूपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे, सुरेश घोडके, निलेश काटकर, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे, स्वप्निल सावंत, तनुजा शेख यांच्या पथकाने गोपनीय बातमीदारामार्फत सखोल माहिती मिळवली. त्यातून संबंधित संशयित इसम लोणंद व निरा येथील परिसरात असल्याची माहिती उपलब्ध झाली. त्यानुसार लोणंद येथे अबू हसन याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देऊन माझ्यासोबत माझा चुलता रजा इराणी हा सुद्धा होता, अशी माहिती दिली. रजा मास्तर याला पलूस येथून अटक करण्यात आली आहे.
या आरोपींनी दोन घरफोड्या केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यांच्याकडून या घरफोड्यातील अडीच तोळे किंमतीचे सोने हस्तगत करण्यात आले आहे. चालू बाजारभावाप्रमाणे या मुद्देमालाची एक लाख 70 हजार किंमत आहे. या यशस्वी तपासाबाबत तपास पथकाचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी कौतुक केले आहे.
शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून दोन चोरीचे गुन्हे उघड
एक लाख 70 हजार रुपये किंमतीचे अडीच तोळे सोने हस्तगत
by Team Satara Today | published on : 19 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा