साताऱ्यात पार्किंग सुविधा निर्माण करण्याची गरज; योग्य जागा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी

by Team Satara Today | published on : 08 September 2026


सातारा : साताऱ्याला शिस्तबद्ध वाहतूक हवी असेल, तर शिस्तबद्ध पार्किंग व्यवस्था निर्माण करावी लागेल. नागरिकांना दोष देण्यापेक्षा त्यांना वाहन लावण्यासाठी योग्य जागा द्या; मग रस्ते मोकळे होतील, वाहतूक सुरळीत होईल आणि नागरिकही नियमांचे पालन करतील.वाहन पार्किंगसाठी योग्य जागा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाचीही जबाबदारी आहे. नागरिकांना कायदा पाळायला सांगतानाच कायद्याचे पालन करणे शक्य होईल, अशी व्यवस्था प्रशासनाने निर्माण केली पाहिजे.
सातारा शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. शहरातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना उपलब्ध रस्ते आणि पार्किंगची जागा मात्र मर्यादित आहे. त्यामुळे राजवाडा, मोती चौक, शनिवार चौक, खणआळी, पोवई नाका, बसस्थानक परिसर, राधिका चौक, मार्केट यार्ड, कमानी हौद, देवी चौक, गोलबाग, सदाशिव पेठ, समर्थ मंदिर चौक, जिल्हा परिषद चौक, करंजे नाका आदी वर्दळीच्या भागांत वाहतूक कोंडीची समस्या जाणवते.
संपूर्ण दोष नागरिकांच्या माथी मारणे योग्य ठरणार नाही
मात्र या समस्येकडे पाहताना संपूर्ण दोष नागरिकांच्या माथी मारणे योग्य ठरणार नाही. कामाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकाला व्यापारी पेठेत, शासकीय कार्यालयात, बँकेत, बाजारात किंवा दवाखान्यात जावे लागते. विशेषतः रुग्णाला दवाखान्यात घेऊन जाताना त्याच्या जवळ वाहन उभे करण्याची गरज असते. अशा वेळी वाहन कुठे लावायचे, हा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहतो. शहरात पुरेशी आणि सोयीची पार्किंग व्यवस्था नसेल, तर नागरिकांनी वाहने कुठे उभी करावीत?  व्यापारी पेठा, दवाखाने, बाजारपेठा आणि शासकीय कार्यालयांच्या परिसरात नियोजित वाहनतळ उपलब्ध असतील, तर नागरिकांना रस्त्यावर वाहने उभी करण्याची वेळच येणार नाही.
अरुंद रस्त्यांवर दुतर्फा वाहने उभी राहिल्यास वाहतुकीस अडथळा
अरुंद रस्त्यांवर दुतर्फा वाहने उभी राहिल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होतो, हे निश्चितच खरे आहे. त्यामुळे अशा ठिकाणी बेशिस्त पार्किंगवर नियंत्रण आवश्यक आहे. मात्र ‘नो पार्किंग’चे फलक लावून किंवा वाहनांवर कारवाई करूनच प्रश्न सुटणार नाही. त्याऐवजी पर्यायी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देणे अधिक परिणामकारक ठरेल. शहरातील प्रमुख व्यापारी भागांमध्ये पे-अँड-पार्क, बहुमजली वाहनतळ, दुचाकींसाठी स्वतंत्र पार्किंग, दवाखान्यांच्या परिसरात अल्पकालीन पार्किंग आणि ‘पार्क अँड वॉक’ अशा सुविधा निर्माण करता येतील. उपलब्ध शासकीय, पालिका अथवा इतर योग्य जागांचा अभ्यास करून त्यांचा वाहनतळासाठी उपयोग करता येईल.
पुरेशी पार्किंग व्यवस्था करणे बंधनकारक केले पाहिजे
भविष्यात नवीन घरे आणि इमारती बांधताना तळमजल्यात किंवा इमारतीच्या आवारात पुरेशी पार्किंग व्यवस्था करणे बंधनकारक केले पाहिजे. बांधकाम आराखडा मंजूर करताना पार्किंगची जागा उपलब्ध आहे की नाही, याची काटेकोर तपासणी होणे आवश्यक आहे. आज पार्किंगचा विचार न करता बांधलेल्या इमारती उद्या शहरासाठी मोठी समस्या ठरू शकतात.
‘पार्किंग प्रथम, कारवाई नंतर’ अशी भूमिका प्रशासनाने स्वीकारली पाहिजे
त्याचबरोबर नागरिकांनीही आपली वाहने शक्यतो घरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर कायमस्वरूपी न लावता उपलब्ध वाहनतळाचा वापर करण्याची सवय लावून घ्यावी. सार्वजनिक रस्ता हा सर्वांच्या वापरासाठी आहे; तो कोणाच्याही वैयक्तिक पार्किंगसाठी नाही. मात्र यासाठी प्रशासनानेही नागरिकांना सहकार्य करणे गरजेचे आहे. चांगली, सुरक्षित आणि सहज उपलब्ध पार्किंग व्यवस्था निर्माण केली, तर वाहतुकीला अडथळा येणार नाही आणि वाहन पार्क केल्याबद्दल कारवाई होण्याची भीतीही नागरिकांना राहणार नाही. नागरिक आणि प्रशासन यांच्यात संघर्ष निर्माण करण्याऐवजी दोघांनी मिळून हा प्रश्न सोडविण्याची गरज आहे. सातारा शहर वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी केवळ दंडात्मक कारवाई नव्हे, तर ‘पार्किंग प्रथम, कारवाई नंतर’ अशी भूमिका प्रशासनाने स्वीकारली पाहिजे. नागरिकांना पर्याय न देता केवळ कारवाई करणे हा कायमस्वरूपी उपाय ठरू शकत नाही.
प्रशासनाची जबाबदारी योग्य जागांची निवड
शहरातील मध्यवर्ती भागात वाहनतळासाठी (Parking Space) स्वतंत्र आणि मोकळी जागा आरक्षित करणे.कडक अंमलबजावणी: नो-पार्किंगच्या केवळ घोषणा न करता वाहनचालकांसाठी पर्यायी जागांची आधी उपलब्धता करून देणे.अतिक्रमण हटाव: रस्त्यावरील बेकायदा अडथळे आणि अनाधिकृत पार्किंगवर सात्यपूर्ण कारवाई करणे


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
माहुलीतील विद्यार्थ्यांच्या हातात ‘खेळण्यांचा खजिना’; 'साहित्यवेल'च्या गावोगावी वाचन प्रसार जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुढील बातमी
राजवाडा परिसरात ड्रॅगन पेटला; नागरिकांची पळापळ, सह्याद्रीचा राजा मित्र मंडळाच्या श्री आगमन मिरवणुकीत थरार

संबंधित बातम्या