जिल्ह्यातील टोलनाक्यांवर दिवसभर वाहतुकीची कोंडी; ‘फास्टटॅग’ असूनसुद्धा सुमारे एक ते दोन किलोमीटरच्या रांगा

by Team Satara Today | published on : 21 September 2026


सातारा : गौरी-गणपतीच्या विसर्जनानंतर गणेशभक्त पुणे-मुंबईच्या दिशेने निघाले. त्यामुळे महामार्गावर वाहतुकीचा प्रचंड ताण आला. जिल्ह्यातील टोलनाक्यांवर दिवसभर वाहतुकीची अभूतपूर्व कोंडी झाली. आनेवाडी टोलनाक्यावर तर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या. कोंडीमुळे प्रवासी व वाहनचालक त्रस्त झाले.
बहुतांश घरातील गौरी-गणपतींचे विसर्जन झाल्यामुळे गणेशभक्त आपल्या गावाला भक्तिभावाने रामराम करत नोकरीच्या ठिकाणी निघाले. रविवारी जिल्ह्यातील महामार्ग ओसंडून वाहिला. पुणे व मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर वाहनांची संख्या लक्षणीय होती. आनेवाडी टोलनाक्यावर सकाळपासूनच पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. ‘फास्टटॅग’ असूनसुद्धा सुमारे एक ते दोन किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या.
रविवारी होणारी गर्दी लक्षात घेऊन महामार्ग पोलिस पथकाने टोलनाक्यावर पोलिस पथक कार्यरत केले होते. टोलनाक्यांवरील गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने पोलिस कर्मचारी व टोलनाक्यांवरील कर्मचारीही काम करताना दिसत होते. तरीही वाहन चालक आणि टोलनाका कर्मचारी यांच्यात लहानसहान कुरबुरी होताना दिसत होत्या.
गौरी विसर्जनासोबत शनिवारी घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन पार पडल्याने चाकरमान्यांनी पुणे-मुंबईच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू केला. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन त्याचा मोठा फटका तासवडे टोल नाका परिसरात वाहनचालकांना बसला. रविवारी सकाळपासूनच कोल्हापूरकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे वाहनचालकांना बराच वेळ कोंडीत अडकून राहावे लागल्याने मोठा त्रास सहन करावा लागला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
'कचरा टाकू नये'च्या पाटीखालीच कचर्‍याचा डोंगर! सातारा पालिकेच्या स्वच्छता मोहिमेला नागरिकांकडूनच हरताळ; कारवाईचा धाक कुठे?
पुढील बातमी
राम मंदिरात देणगी चोरीच्या १०५ घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद; तपास अंतिम टप्‍प्‍यात, SIT २५ सप्‍टेंबरपर्यंत आरोपपत्र दाखल करणार

संबंधित बातम्या