‘पंतप्रधान इंटर्नशिप योजने’ला (पीएमआयएस) अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद न मिळाल्याने सरकार चिंतेत

१.२५ लाख इंटर्नशिप्सची ऑफर; रुजू फक्त ८,७६०

by Team Satara Today | published on : 13 October 2025


नवी दिल्ली : देशातील लाखो तरुणांना दरवर्षी रोजगार प्रशिक्षणाची संधी देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘पंतप्रधान इंटर्नशिप योजने’ला (पीएमआयएस) अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद न मिळाल्याने सरकार चिंतेत आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशभरातील ३५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून केवळ ८,७६० उमेदवारांनी पहिल्या टप्प्यात प्रत्यक्षात इंटर्नशिप सुरू केली आहे.

सरकारने १.२७ लाख इंटर्नशिपच्या संधी प्रमुख ५०० कंपन्यांमार्फत उपलब्ध करून दिल्या. त्यासाठी तब्बल ६.२१ लाख अर्ज प्राप्त झाले. मात्र, ऑफर मिळाल्यानंतर फक्त २८,००० उमेदवारांनीच याचा स्वीकार केला. शेवटी फक्त ८,७६० जण प्रत्यक्ष रुजू झाले. दुसऱ्या फेरीत, २४,००० हून अधिक उमेदवारांनी इंटर्नशिपमध्ये सामील होण्यासाठी ऑफर स्वीकारल्या आहेत. परंतु दुसऱ्या फेरीत प्रत्यक्ष रुजू होण्याचे अधिकृत आकडे उघड केलेले नाहीत; कारण ते अद्याप प्रक्रियेत आहे. 

हा प्रतिसाद उत्साहवर्धक नसल्याचे दिसून येते.

३२७ कंपन्यांनी १.१८ लाखांहून अधिक इंटर्नशिप संधी उपलब्ध करून दिल्या. ४.५५ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आणि ८२,००० ऑफर देण्यात आल्या. सूत्रांचे म्हणणे आहे की, ही संख्या निराशाजनक आहे.

स्टायपेंड वाढवण्याचा केंद्र सरकारचा विचार

सरकार आता पीएम इंटर्नशिपसाठी स्टायपेंड (विद्यावेतन) वाढवण्याचा आणि इतर पावले उचलण्याचा विचार करत आहे. सध्या, पीएमआयएसमधील प्रत्येक उमेदवाराला दरमहा ५,००० स्टायपेंड मिळतो आणि एकदाच ६,००० रुपये जॉइनिंग ग्रँट दिले जाते. 

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी या योजनेला सुरुवात केली. ज्यामध्ये एका वर्षात तरुणांना १.२५ लाख इंटर्नशिप संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.

राज्यनिहाय इंटर्नशिप करणारे सर्वाधिक कुठे?

उत्तर प्रदेश      १२४१ 

आसाम    ९९७

महाराष्ट्र     ४१९

गुजरात     २४९

हरयाणा    २८९

पंजाब    ६०

गोवा     ३

मिझोरम     १



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
डोनाल्ड ट्रम्प युक्रेनला देणार हे घातक क्षेपणास्त्र

संबंधित बातम्या