सातारा : अतिवृष्टीमुळे कंबरडे मोडलेल्या सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकरी यांच्या हितासाठी आणि त्यांना दिवाळी सण साजरा करता यावा, यासाठी सातारा जिल्ह्यातील सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांनी दुसरा हप्ता तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करावा. जिल्हा प्रशासनाने याबाबत पुढाकार घ्यावा, अशी मागणी रयत क्रांती शेतकरी संघटनेने केली आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव व उपाध्यक्ष देवदास जाधव यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले.
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील अनेक साखर कारखान्यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना उसाच्या दुसऱ्या हप्त्याची देणी दिली आहेत, तर काही कारखाने देणार आहेत. सातारा तालुक्यातील अजिंक्यतारा साखर कारखान्याने प्रति टन शंभर रुपयांचा दुसरा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे. अजिंक्यतारा कारखाना हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा ऊस गाळप करत आहे. इतर कारखाने देखील शेतकऱ्यांचा ऊस गाळप करतात ते मात्र दुसरा हप्ता देण्याबाबत कोणतीही जाहीर भूमिका घेत नाहीत, हे दुर्दैव आहे, अशी टीका मधुकर जाधव यांनी केली.
केंद्र आणि राज्य सरकारने सातारा जिल्ह्यातील सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांना आदेश देऊन मागील गळीत झालेल्या उसाचा प्रतिटन पाचशे रुपयांचा दुसरा हप्ता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी असल्याचे जाधव यांनी निदर्शनास आणून दिले. सर्व कारखान्यांनी समान हप्ता दिला आहे असे नाही. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सातारा जिल्ह्यातील सहकारी आणि खाजगी कारखान्यांकडूनही दिवाळीसाठी दुसरा हप्ता मिळण्याची अपेक्षा आहे.
दीपावलीपूर्वी अंतिम हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करून कारखान्याने गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिलेला शब्द पूर्ण करावा. त्याद्वारे रब्बी हंगामासाठी सोसायटी रकमेचा भरणा करण्यास शेतकऱ्यांना मदत होणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.