सातारा जिल्ह्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे सामूहिक पाऊल

by Team Satara Today | published on : 01 September 2025


सातारा : सातारा जिल्ह्यातील नागरिकांसाठी यंदाचा गणेशोत्सव विशेष ठरणार आहे. पर्यावरण संवर्धन आणि जलसंपदा रक्षणाचा संदेश देत जिल्हा प्रशासनाने पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी व्यापक नियोजन केले आहे.

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 1423 ग्रामपंचायतींमध्ये नैसर्गिक तळी व जुन्या पडक्या विहिरी, तर 488 विसर्जन कुंडांची निर्मिती करून जलप्रदूषणाला आळा घालण्याची सोय केली आहे. याशिवाय मूर्ती विसर्जनानंतर मूर्ती कुंभारांकडे सुपूर्द करण्याची व्यवस्था व 221 ग्रामपंचायतींनी तयार केलेली कुंभारांची यादी हा उपक्रम अधिक परिणामकारक ठरणार आहे.

निर्माल्याचे व्यवस्थापन हा उपक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे.

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कृत्रिम तळ्यांमध्येच मूर्ती विसर्जन करावे. निर्मल्याचे योग्य संकलन करून पाण्याचे प्रदूषण टाळावे. पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून भावी पिढ्यांसाठी शुद्ध, सुरक्षित आणि हरित वारसा जपावा. या उपक्रमातून सातारा जिल्हा देशासाठी आदर्श ठरणारा हरित गणेशोत्सव साजरा करणार आहे.

1352 ग्रामपंचायतींमध्ये ट्रॅक्टर, 280 ग्रामपंचायतींमध्ये घंटागाड्या व डस्टबिन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. संकलित निर्माल्यापासून जैविक खत निर्मितीची प्रक्रिया 1368 ग्रामपंचायतींमध्ये राबवली जाणार असून, हा उपक्रम कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करण्याचा आदर्श ठरणार आहे, अशी माहिती स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने- भोसले यांनी दिली

ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांनी या उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, दि. 2 सप्टेंबर व दि.6 सप्टेंबर (अनंत चतुर्दशी) या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यावरणपूरक विसर्जन होणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी संपर्क अधिकारी नेमल्यामुळे कामाचा वेग व अंमलबजावणी अधिक सुकर होईल.

या उपक्रमात सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, युवक मंडळे, सामाजिक संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशावर्कर आणि स्थानिक नागरिक एकत्र सहभागी होणार आहेत. लोकसहभागामुळे हा उत्सव खऱ्या अर्थाने लोकाभिमुख व यशस्वी ठरणार असल्याचा विश्वास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी व्यक्त केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा पोलिसांच्या दंगाविरोधी पथकाची प्रात्यक्षिके
पुढील बातमी
पल्स वाढवतेय वाहनधारकांची पल्स : गणेश अहिवळे

संबंधित बातम्या