कराड : कराड शहराच्या सुशोभिकरणासाठी उभारण्यात आलेली बंद असलेली कारंजी तात्काळ कार्यान्वित करावीत. अन्यथा बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा निवेदनाद्वारे इशारा राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वंयरोजगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला यांनी दिला आहे.
याबाबत मुल्ला यांनी कराड नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांना निवेदन दिले आहे. निवेदनात असे म्हटले आहे की, कराड शहर सुशोभिकरणासाठी नगर परिषदेकडून लाखो रुपये खर्च करुन कराड शहरातील चौका-चौका मध्ये जी कारंजी उभी करण्यात आलेली आहेत, ती सर्व कारंजी आज रोजी बंद अवस्थेत आहेत. सध्या गणेशोत्सवाचा काळ असल्यामुळे डेकोरेशन (देखावे) पाहणेसाठी परिसरातील नागरिक कराड शहरात येत असतात. त्यामुळे ही कारंजी तात्काळ सुरु करण्यात यावीत. येत्या सात दिवसांत बंद अवस्थेत असणारी कारंजी सुरु न केल्यास नाईलाजास्तव आपल्या कार्यालयाबाहेर बेमुदत प्राणांतिक उपोषण सुरु करावे लागेल, असेही मुल्ला यांनी निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना तालुका मार्गदर्शक राकेश पवार, तालुकाध्यक्ष सचिन भिसे, तालुका कार्याध्यक्ष सागर लादे, शहराध्यक्ष विकी शहा, शहर कार्याध्यक्ष साजिद मुल्ला, कराड शहर उपाध्यक्ष पंकज मगर, शाखा प्रमुख सिद्धार्थ सागरे यांची उपस्थिती होती. निवेदनाच्या प्रती सातारा जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.