सातारा : सहकार क्षेत्रातील साखर कारखाने हे ग्रामीण भागाचा आर्थिक कणा आहेत. सहकारी साखर कारखाने सक्षमपणे चालल्यास त्या- त्या भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले जाते. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अजिंक्यतारा साखर कारखाना आहे. राज्यातील इतर सहकारी साखर कारखान्यांसाठी अजिंक्यतारा कारखान्याचे कामकाज दिशादर्शक आहे, असे गौरवोद्गार ॲडिशनल सेक्रेटरी, सहकार मंत्रालय, भारत सरकार आणि नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कार्पोरेशन, नवी दिल्लीचे कार्यकारी संचालक पंकज कुमार बन्सल यांनी काढले.
आयएएस अधिकारी बन्सल यांनी नुकतीच अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यास सदिच्छा भेट दिली. कारखान्याच्या कामकाजाची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार व स्वागत करण्यात आले. यावेळी बन्सल यांच्या सुविद्य पत्नी G. Latha (IAS) उपस्थित होत्या.
अजिंक्यतारा कारखाना शेतकऱ्यांच्या उसाला उच्चतम दर देत आहे तसेच गाळप झालेल्या उसाचे पेमेंट वेळेत अदा करत आहे, याबद्दल बन्सल यांनी समाधान व्यक्त केले. कारखान्याने शेतकऱ्यांचे प्रति एकरी उत्पादन वाढवण्यासाठी एआय टेक्नॉलॉजीचा वापर करावा, त्याचप्रमाणे साखर उत्पादना बरोबरच उपपदार्थ प्रकल्पांच्या क्षमता वाढवाव्या, आणि सीबीजी प्रकल्प हाती घ्यावेत, केमिकल्स उत्पादन करावे, अशा सूचना बन्सल यांनी यावेळी केल्या.
याप्रसंगी सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, एनसीडीसी पुण्याचे रिजनल डायरेक्टर गिरराज अग्निहोत्री, डायरेक्टर पुनीत गुप्ता आणि गणेश गायकवाड, प्रादेशिक सहसंचालक नीलिमा गायकवाड, सातारा जिल्हा निबंधक संजय सुद्रिक, कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, व्हाईस चेअरमन नामदेव सावंत, संचालक सर्जेराव सावंत, रामचंद्र जगदाळे, सर्व संचालक तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते आणि अधिकारी उपस्थित होते.