मुंबई: राज्याच्या राजधानीतून एक अत्यंत हादरवून टाकणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. मालाड परिसरात राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाचे अपहरण करून, त्याला थेट बंगळुरू येथे नेण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे, तिथे या तरुणाची जबरदस्तीने लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा गंभीर आरोप पीडित तरुणाने आणि त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
याप्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, पीडित तरुण मालाड परिसरात राहत आहे. असे असताना येथील तृतीयपंथीयांच्या एका टोळीने त्याचे अपहरण केले. या टोळीने त्याला मुंबईबाहेर बंगळुरू येथे नेले आणि तिथे डांबून ठेवले.
पीडित तरुणाच्या आरोपानुसार, बंगळुरू येथेच या टोळीने त्याच्या इच्छेविरुद्ध जात त्याची लिंगबदल शस्त्रक्रिया केली. या भयंकर प्रकारानंतर पीडित तरुणाने कसाबसा मालवणी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मालवणी पोलिसांनी या अत्यंत गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेतली असून, पीडित तरुणाच्या तक्रारीवरून संबंधित तृतीयपंथी टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी कसून तपास करत आहेत.