छत्रपती शिवरायांनी कधीही हिंदू-मुस्लीम भेदभाव केला नाही

खा. श्री. छ. उदयनराजे : मी मटण खात नाही, ज्यांना खायचे त्यांनी खावे

by Team Satara Today | published on : 12 March 2025


सातारा : राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी झटका मटण तसेच छत्रपती शिवरायांच्या सैन्यात एकही मुस्लीम सैनिक नव्हता, असे म्हणत राज्यात खळबळ उडवून दिली असतानाच आज दि. 12 रोजी कराड येथे खा. उदयनराजेंनी नितेश राणेंचे नाव न घेता त्यांना शेलक्या भाषेत फटकारले.

मल्हार झटका मटण तसेच हलाल मटण यावर भाष्य करुन हिंदूंनी फक्त मल्हार प्रमाणपत्र नोंदणीकृत विक्रेत्यांकडूनच मटण खरेदी करावे, अशी खळबळजनक विधान राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी अलिकडे केले होते. त्यानंतर वारंवार त्यांनी यासंदर्भात माध्यमांशी बोलताना हलाल विरुद्ध झटका असा वाद राज्यभरात पेटवल्याने भाजपा बॅकफूटवर गेली होती. त्यातच एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये एकही मुस्लीम सैनिक नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई ईस्लामच्या विरोधात होती. ही लढाई हिंदू विरुद्ध मुसलमान अशीच होती, असे म्हणत त्यांनी नवीनच वादाला तोंड फोडले होते. नितेश राणेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण गरम झाले आहे. यावर अनेक आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज कराड दौर्‍यावर असताना माध्यम प्रतिनिधींनी खा. उदयनराजेंना मंत्री राणेंच्या वक्तव्यासंदर्भात छेडले असता त्यांनी यावेळी सांगितले, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवताना सर्वधर्मसमभाव पाळला. त्यांनी कधीही हिंदू-मुस्लीम भेदभाव केला नाही. त्यांनी जर हिंदू-मुस्लीम केले असते तर आजही आपण मोघलांच्या गुलामगिरीत असतो, असेही राणेंचे नाव न घेता त्यांनी यावेळी सुनावले. तसेच झटका-हलाल प्रकरणावरुन मी मटण खात नाही, ज्यांना खायचे आहे, त्यांनी खुशाल खावे, असा सल्ला द्यायलाही ते विसरले नाहीत.

मंत्री नितेश राणे हे नेहमी वादग्रस्त वक्तव्य करुन दोन समुदायामध्ये धार्मिक तेढ निर्माण करताहेत, असे आरोपही यापूर्वी त्यांच्यावर झाले आहेत. परंतू अलिकडच्या त्यांच्या वक्तव्यावरुन त्यांच्याच पक्षाचे असणारे खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांचे नाव न घेता त्यांना चांगलेच फटकारले.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
होळीला पक्का रंग लागला तरी १५ मिनिटांत निघून जाईल
पुढील बातमी
बौद्धगया येथील महाविहार नियंत्रण आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा

संबंधित बातम्या