महाराष्ट्रातील मतदार यादीतून २ कोटी नावे हटवली; निवडणूक आयुक्तांच्या भेटीनंतर रोहित पवारांचा दावा

by Team Satara Today | published on : 17 August 2026


मुंबई : महाराष्ट्राच्या मतदार यादीतून २ कोटी नावे वगळण्यात आली आहेत. माहिती न आल्याने ही नावे वगळली. ७ कोटी ७० लाख मतदारांची सगळी माहिती आलेली आहे. त्यातील पात्र नावे वेगळी करणार आहेत. शिवाय या ७ कोटी ७० लाखातून अशीही यादी तयार करण्यात येणार आहेत ज्यात अपूर्ण माहिती, नावात बदल असणाऱ्यांचा समावेश असेल. त्यामुळे २ कोटीचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आमदार रोहित पवार म्हणाले की, २ कोटी नावे हटवण्यात आली आहेत ती कोणत्या आधारे काढली याची माहिती आम्ही विचारली. तेव्हा त्यात ३४ लाख मतदार असे आहेत जे मृत झालेले आहेत. ज्यांच्या घरी कुणी सापडले नाही अशी ७६ लाख नावे आहेत आणि जे कायमचे पत्ता बदलून गेलेत त्यांची नावे ७७ लाख आहेत. इतर २ लाख जणांनी माहिती देण्यास नकार दिला वैगेरे आहेत. ज्यांचा मृत्यू झाला आहे असं दाखवले, उद्या त्यापैकी कुणी समोर आले तर त्यासाठी अर्ज ६ भरू शकतात असं अधिकाऱ्यांनी सांगितले. जे गैरहजर होते तेदेखील अर्ज ६ भरू शकतात. मतदार यादीचे शुद्धीकरण करण्यासाठी ही प्रक्रिया राबवली पण उद्या ज्यांची नावे वगळली त्यांनाही यादीत घेतले जाऊ शकते. अधिकारी स्पष्टपणे उत्तरे दिली नाहीत. ज्यांची नावे वगळली आहेत त्यातील काही नावे पुन्हा यादीत घेतली जाऊ शकतात असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

तसेच भाजपाकडून एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. ज्यात आपल्या विचारधारेचे, संदिग्ध आणि विरोधी असे ३ कॅटेगिरी केले आहेत. गेल्या तीन साडे तीन महिन्यापासून राज्यात SIR चे काम सुरू आहे. हा सगळा भार BLO यांच्यावर आला आहे. ज्यात कुणी शिक्षक आहे, कुणी ग्राम अधिकारी आहेत. BLO यांना टार्गेट देऊन काहीही झाले तरी १०० टक्के छाननी करून घ्या असा आदेश दिला आहे. मात्र त्यांना हे शक्य नाही. मग अशावेळी ते एखाद्या पक्षाच्या कार्यालयात बसून टेबल सर्व्हे करत आहेत. BLO यांच्यावर कामाचा भार आहे. या टेबल सर्व्हेला माहिती भाजपा कार्यकर्ते देत आहेत. पुणे, नाशिक, ठाणे याठिकाणी हे प्रकार समोर आले आहेत. या प्रकारावर कारवाई करण्याचं आश्वासन निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहे असंही रोहित पवारांनी म्हटलं.

दरम्यान, या सॉफ्टवेअरच्या मदतीने भाजपा BLO यांना हाताशी धरून राजकीय कुबड्या बाजूला करण्याचं काम करत आहे. एका पत्रकाराचे नाव यादीतून काढले गेले, त्या महिला पत्रकाराने अधिकाऱ्यांना जाब विचारला. तेव्हा व्हॉट्सअपवर तुमचे आधार कार्ड पाठवा आम्ही नोंदणी करून घेतो असं अधिकारी म्हणाले. लगेच नोंदणीही झाली. त्या पत्रकार आहेत, लढल्या म्हणून त्यांचे झाले पण असं भाजपाच्या दबावाखाली तुम्ही किती जणांची नावे नोंदणी करून घेतली आहेत? आमच्याकडे २८८ मतदारसंघाच्या याद्या आहेत. २४ तारखेला प्राथमिक यादी निवडणूक आयोग जाहीर करेल. त्यानंतर आमच्याकडील याद्या आणि ही यादी याची पडताळणी करू. पश्चिम बंगाल, बिहारमध्ये अनेक नावे वगळली. पश्चिम बंगालमध्ये ४० लाख मतदार वगळले होते, निवडणूक झाल्यानंतर त्यांच्यापैकी ८० टक्के मतदारांची पुन्हा नोंदणी करून घेतली. आम्ही सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत असं सांगत रोहित पवारांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिराळ्याची जगप्रसिद्ध नागपंचमी "अंबाबाईच्या नावाने चांगभले"च्या गजरात उत्साहात; ४१ जिवंत नागांचे दर्शन घडल्याने भाविकांच्या उत्साहाला उधाण
पुढील बातमी
आरक्षण रद्द करण्याची मागणी करणारे राष्ट्रद्रोही; कठोर कारवाई करण्याची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी

संबंधित बातम्या