खंडाळा : खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी येथे सोमवार दि. 27 रोजी मध्यरात्री घडलेल्या थरारक हल्ल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. घराबाहेर बोलावून एका 26 वर्षीय युवकावर प्रथम लाथाबुक्क्यांनी, दगड, विटा व लाकडी पट्टीने जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यानंतर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. त्यातील एक गोळी युवकाच्या उजव्या बाजूस लागल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शिरवळ पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत चारही संशयित आरोपींना अटक केली आहे.
याबाबत शिरवळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार दत्तात्रय क्षीरसागर (वय 26, रा. शिरवळ, ता. खंडाळा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राकेश चव्हाण (पूर्ण नाव माहिती नाही), साई ऊर्फ सिद्धार्थ गोलांडे, ओंकार माने आणि बाबुशेट्टी (सर्व रा. शिरवळ परिसर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, सोमवारी रात्री सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास शिंदेवाडी येथील रहिवासी कोमल सुगंध पवार यांच्या घरासमोरील मोकळया जागेत ही घटना घडली. फिर्यादी ओंकार क्षीरसागर यांना ओंकार माने याने घरासमोर बोलावून घेतले. त्यानंतर पूर्वीचा राग मनात धरून संशयित आरोपींनी संगनमताने त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर घटनास्थळी पडलेल्या विटा, दगड व लाकडी पट्टीचा वापर करून डोक्यावर, हातावर व शरीराच्या विविध भागांवर वार करण्यात आले. मारहाणीत फिर्यादी खाली कोसळल्यानंतरही आरोपी थांबले नाहीत. फिर्यादीनुसार, संशयित आरोपी राकेश चव्हाण याने स्वत:जवळील पिस्तुलातून गोळी झाडली. त्यातील एक गोळी फिर्यादीच्या उजव्या बाजूस लागल्याने ते गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील उपचारासाठी पुण्याकडे हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसराची नाकाबंदी करून पंचनामा करण्यात आला. घटनास्थळावरून पिस्तुलाचे मॅगझिन, रिकामी काडतुसे तसेच इतर महत्त्वाचे भौतिक पुरावे जप्त करण्यात आले. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन वैधानिक पुरावे संकलित केले असून ते तपासासाठी पाठविण्यात आले आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे. तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे कारवाई करत शिरवळ पोलिसांनी चारही संशयित आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे. पुढील तपास सपोनि शिंदे करीत आहेत.
भरवस्तीत घडलेल्या या जीवघेण्या हल्ला आणि गोळीबारामुळे शिंदेवाडीसह संपूर्ण खंडाळा तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, घटनेनंतर अल्पावधीतच शिरवळ पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत चारही संशयित आरोपींना अटक केल्याने तपासाला गती मिळाली आहे. या धाडसी कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून गुन्ह्याचा संपूर्ण तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.