कोणत्याही क्षेत्रात सर्वोत्तम काम करा, नैतिकता जपा; तुकाराम मुंढे यांचं तरुणांना आवाहन, शफी पठाण लिखित ‘तुकाराम’ पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन

by Team Satara Today | published on : 18 July 2026


पुणे  : लोकसेवेसाठी शक्य तितके प्रयत्न करत राहण्याचा माझा प्रयत्न आहे. कोणतेही पद हे केवळ लोकसेवेचे माध्यम असते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा कधीच अपयशी होत नाही. चांगला माणूस आणि कुटुंबातला, समाजातला चांगला घटक बनणे हे आपले ध्येय असले पाहिजे. आपण कोणत्याही क्षेत्रात असाल तरी तिथे सर्वोत्तम काम करा. कोणतेही काम करताना नैतिकता आचरणात असायला हवी, अशी अपेक्षा तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केली.

न्यू ईरा पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित आणि शफी पठाण लिखित ‘तुकाराम’ या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी पुण्यात झाले. सरहद, पुणेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी   ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे होते. याप्रसंगी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे, माजी अपर जिल्हाधिकारी अशोक मुंढे, माजी सनदी अधिकारी संग्राम गायकवाड, सरहदचे संस्थापक संजय नहार, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर आदी उपस्थित होते.

आयुष्यभर तत्त्वांचे अधिष्ठान टिकवणे सोपे नसते. आज शिक्षणापासून इतर अनेक क्षेत्रांपर्यंत भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले आहे. नैतिक श्रेष्ठतेच्या, नीतिमत्तेच्या गोष्टी बोलून सत्तास्थाने मिळवली जात आहेत. लोकप्रतिनिधी अर्वाच्य भाषेत बोलताना दिसत आहेत. देशासह महाराष्ट्राचे सांस्कृतिकदृष्ट्या अध:पतन होत आहे. अशा परिस्थितीत समाज स्वच्छ आणि नीतिमान राहण्यासाठी प्रामाणिक अधिकाऱ्यांना पाठबळ देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी केले. 

पठारे म्हणाले, तुकाराम मुंढे हे आपल्यासमोर घडत असलेल्या दंतकथेचे नायक आहेत. सध्याचा काळ अत्यंत कठीण असून, सार्वजनिक जीवनातील भाषेचा आणि राजकीय संस्कृतीचा स्तर खालावत चालला आहे. अशा काळात बदल घडविण्याची इच्छा असलेला अधिकारी समाजासाठी आशेचा किरण आहे. अमृता तांदळे यांनी प्रास्ताविक, तर समिरा गुजर-जोशी यांनी सूत्रसंचालन केले. लेशपाल जवळगे यांनी आभार मानले. 

कार्यक्रमादरम्यान ‘तुकाराम मुंढे’ या नावाभोवतीचे वलय उपस्थितांनी अनुभवले. कार्यक्रम सुरू होण्याआधीच सभागृह ‘हाऊसफुल्ल’ झाले होते. सभागृहाबाहेर अगदी प्रवेशद्वारापर्यंत तरुण-तरुणांची गर्दी ओसंडून वाहत होती.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रत्नागिरीचा भावेश नीट परीक्षेत एसटी प्रवर्गात राज्यात पहिला, देशात चौथा क्रमांक, भावेशला ७२० पैकी ६६६ गुण मिळाले
पुढील बातमी
ऐतिहासिक यश, भारताचं पहिलं खाजगी रॉकेट विक्रम-१ चं यशस्वी प्रक्षेपण; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं अभिनंदन

संबंधित बातम्या