स्थानिक स्वराज्य संस्थांवरही झेंडा फडकवूया : पालकमंत्री देसाई

by Team Satara Today | published on : 03 June 2025


कराड : लोकसभा, विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेचा झेंडा फडकवूया. त्यासाठी पक्ष बळकटीसाठी सज्ज व्हा, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. कराड येथे शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा समन्वयक राजेंद्रसिंह यादव, शिवसेनेचे संपर्कप्रमुख शरद कणसे, जिल्हाध्यक्ष जयवंतराव शेलार, जिल्हा समन्वयक राजेंद्र यादव, चंद्रकांत जाधव, माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, स्मिता हुलवान, सुलोचना पवार, रणजित भोसले आदी उपस्थित होते. 

पालकमंत्री देसाई म्हणाले, ‘‘एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही वेगळी भूमिका घेतल्यावर आमच्यावर टीका झाली. मात्र, राज्यातील जनतेने ८० आमदार निवडून देत पक्ष आणि चिन्ह कोणाचे, यावर शिक्कामोर्तब केले होते. आमचा एकनाथ शिंदे त्यांचे हात आपल्याला बळकट करायचे आहेत. त्यासाठी जिल्हास्तरावर शिवसेना वाढीसाठी संघटन बळकट करणे गरजेचे आहे. एकनाथ शिंदे यांचे जिल्ह्यावर लक्ष आहे. त्यांनी आपल्याला आतापर्यंत मागील तेवढा निधी दिला आहे. आपणही पालकमंत्री म्हणून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आणलेली कामे त्वरित मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. जिल्हाधिकारी, प्रशासन, शासनस्तरावर पाठपुरावा करून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आणलेल्या विकासकामांसाठी आपण मंत्रिपदाचा वापर करणार आहोत.’’

राजेंद्र यादव म्हणाले, ‘‘शिवसैनिक काम करायला इच्छुक आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या दृष्टीने बूथ आणि शाखा बांधणीवर आपण भर देणार आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कऱ्हाडला भरभरून दिले आहे.’’ येत्या निवडणुकीत कऱ्हाडच्या पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवू, अशी ग्वाही दिली.

यापूर्वी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत आणि जिल्हा समन्वयक राजेंद्रसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली कऱ्हाड शहर, तालुका, तसेच जिल्हाभरातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. पालकमंत्री देसाई यांनी त्यांचे स्वागत करत नियुक्तिपत्रे दिली. सैनिक स्कूलमध्ये प्रवेश मिळवलेल्या कऱ्हाड पालिकेच्या शाळा क्रमांक तीनमधील विद्यार्थ्यांचा सत्कार पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते झाला. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विहिरीत मुक्काम ठोकलेल्या मगरीला जिवंत गाडण्याचा प्रयत्न
पुढील बातमी
खंडणीप्रकरणी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांची सात तास चौकशी

संबंधित बातम्या