कराड, दि. 12 : आबईचीवाडी, ता. कराड येथे घरगुती वीज मीटरमध्ये छेडछाड करून, वीज चोरी केल्याचा प्रकार महावितरणच्या भरारी पथकाने केलेल्या तपासणीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी दीड लाख रुपयांचे वीज देयक आणि दहा हजार रुपयांचे तडजोड शुल्क आकारण्यात आले आहे. याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महावितरणच्या भरारी पथकातील सहाय्यक अभियंता वैभव मदने, कनिष्ठ अभियंता किशोर निकम, वरिष्ठ तंत्रज्ञ किरण देवकर व प्रवीण सरवदे हे दि. 14 जुलै रोजी आबईचीवाडी येथील अमृत सुर्वे यांच्या घरातील वीजमीटरची तपासणी करण्यासाठी गेले. त्यावेळी अंकिता सुर्वे यांनी वीजमीटर दाखवले. हे मीटर घराच्या भिंतीवर पत्र्याच्या पेटीत बसवण्यात आले होते. भरारी पथकातील अधिकार्यांनी मीटर तपासले असता, ते उणे 65 टक्के कमी वेगाने चालत असल्याचे आढळले. मीटरमध्ये छेडछाड झाल्याचे स्पष्ट झाल्याने, पंचनामा करून मीटर सीलबंद अवस्थेत जप्त करण्यात आले. त्यानंतर 15 जुलै रोजी सातारा येथील चाचणी विभागात मीटरची फेरतपासणी करण्यात आली. गणेश सुर्वे यांच्या उपस्थितीत मीटर उघडण्यात आले असता, वायर कापून प्रतिरोधक बसवल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे वीज वापराची नोंद कमी होत असल्याचे स्पष्ट झाले.
वीज कायदा 2003 च्या कलम 135 अन्वये हा प्रकार म्हणजे वीज चोरी मानून, सुर्वे यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांना मागील 12 महिन्यांचे पाच हजार 140 युनिट वापराचे एक लाख 53 हजार 510 रुपयांचे देयक देण्यात आले. त्यासोबत दहा हजार रुपये तडजोड शुल्क आकारण्यात आले आहे. या देयकाची रक्कम अद्याप भरली नसल्याने, महावितरणने सुर्वे दाम्पत्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.