नवी दिल्ली : विद्यार्थ्यांमधील व्यसनाधीनता व वाढता स्क्रीन टाइम याबाबत शिक्षकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मुलांना मोबाइल आणि अन्य उपकरणांपासून दूर ठेवण्यासाठी खेळ, शारीरिक हालचाली आणि सर्जनशील उपक्रमांकडे वळवावे, असेही ते म्हणाले. शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित शिक्षकांशी संवाद साधताना मोदी बोलत होते.
एका शिक्षिकेने परिसरातील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती केल्याचा उल्लेख करून मोदी यांनी या पुढाकाराचे कौतुक केले.
यंदा ८२ शिक्षकांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड
यंदा तीन विभागांतील ८२ शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यात शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातील ४८, उच्च शिक्षण संस्था आणि तंत्रनिकेतनमधील २१ शिक्षक आणि कौशल्य विकास तसेच उद्योजकता मंत्रालयातील १३ प्रशिक्षकांचा समावेश आहे.
राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील नऊ शिक्षकांचा गौरव
शिक्षक दिनानिमित्त शनिवारी विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रातील ९ शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला. शालेय शिक्षण क्षेत्रात राज्यातील डॉ. कविता गित्ते (साने गुरुजी निवासी माध्यमिक विद्यालय, बीड), कुंदा जयवंत बच्छाव (नाशिक महापालिका शाळा, नाशिक), वैभव वसंतराव कुलकर्णी (जवाहर नवोदय विद्यालय, लातूर ) व शिवप्रसाद अरविंद टिंगरे (सैनिक स्कूल, सातारा) यांना पुरस्कार मिळाला आहे. उच्च शिक्षण क्षेत्रात डॉ. विक्रम विशाल (भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई), डॉ. संदीपान नरोटे (शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर) व डॉ. अमर मोहनराव ताकसांडे (जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय, वर्धा) यांना गौरविले. कौशल्य विकास व उद्योजकता क्षेत्रात किरण झारकर (शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धाराशिव) व अर्चना जाधव (शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, त्र्यंबकेश्वर, नाशिक) यांचा सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांतील व्यसने, वाढत्या ‘स्क्रीन टाइम’बाबत सतर्क राहा: पंतप्रधान मोदींचा शिक्षकांना सल्ला
by Team Satara Today | published on : 06 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा