सातारा : सासपडे, ता. सातारा येथील दुर्दैवी आर्य चव्हाण या मुलीच्या खूनप्रकरणी सातारा पोलिसांच्या अटकेमध्ये असणाऱ्या राहुल यादव या आरोपीने यापूर्वी गावातीलच एका अल्पवयीन मुलीचा खून केल्याची कबुली दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणात पुन्हा एकदा त्याला अटक केली आहे.
दि. १० ऑक्टोबर 2025 रोजी यादव याने आर्याचा निर्दयी पद्धतीने अत्याचार करण्याचा प्रयत्न करून खून केला होता. या प्रकरणाचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले होते. या प्रकरणाच्या संदर्भाने पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर व धोंडीराम वाळवेकर यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. यादव याला अटक अटक करून तिसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्याकडून पोलीस कोठडी घेण्यात आली. या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी राहुल बबन यादव याने दि. 15 फेब्रुवारी 2024 रोजी सासपडे गावातील आणखी एका मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला आणि तो मृतदेह विहिरीत टाकला अशी कबुली दिली.
बोरगाव पोलिसांनी हा गुन्हा फेरतपासावर घेऊन या प्रकरणात ३०२, ३७६, २०१ ही कलमे दाखल करण्यात आली. हा गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक सातारा यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर करत आहेत. गुरुवार, दि. 30 रोजी या खुनाच्या संदर्भाने बोरगाव पोलीस ठाण्यामध्ये यादव यांच्या विरोधात गुन्हा नोंद करून या आरोपीचा ताबा मिळण्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सातारा यांना लेखी रिपोर्ट देण्यात आला. या गुन्ह्यात स्वतंत्र अटक दाखवून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने करण्यात येत आहे.