सातारा : विना सहकार नही उद्धार, या ब्रीद वाक्यातून सहकाराचे महत्व सिद्ध होते. सहकाराच्या माध्यमातून अनेक संस्था उभ्या राहिल्या आणि त्यामाध्यमातून त्या-त्या संस्थांच्या परिघातील जनतेची आर्थिक समृद्धी झाली. जावली तालुक्यातही सहकाराच्या माध्यमातून कायापालट होईल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ ची घोषणा केली असून त्यानिमित्ताने अजिंक्यतारा-प्रतापगड उद्योग समूहाच्या वतीने जावली तालुक्यात कुडाळ येथे पहिल्यांदाच सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ना. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या मार्गदर्शक संचालिका श्रीमती सुनेत्रा शिंदे, कारखान्याचे अध्यक्ष व व कार्यक्रमाचे आयोजक सैारभ शिंदे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक, अजिंक्यतारा सह. साखर कारखान्याचे अध्यक्ष यशवंत साळुंखे, व्हा.चेअरमन नामदेव सावंत, जावलीचे सहाय्यक निबंधक सुनील जगताप, जिल्हा बँकेचे व्यवस्थापक डॉ. राजेंद्र सरकाळे, डी. एम. के. जावली सहकारी बँकेचे चेअरमन विक्रम भिलारे, व्हा.चेअरमन चंद्रकांत दळवी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, उपसभापतीहेमंत शिंदे, किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे संचालक हिंदुराव तरडे, जिल्हा बँकेचे विभागीय विकास अधिकारी राजेंद्र निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वर्गीय लालसिंगराव शिंदे काका व स्वर्गीय राजेंद्र शिंदे यांनी जावळी तालुक्यात खऱ्या अर्थाने सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी तालुक्यात सहकार रूजवला व वाढवलाही, त्यांचे सहकार क्षेत्रातील योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या पाश्चातही त्यांनी उभारलेल्या सहकारी संस्था त्यांचे वारसदार सैारभ शिंदे यांनी मोठ्या हिमतीने चालवल्या असून प्रतापगड कारखान्यासह, जावळी सहकारी बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पतसंस्था, सोसायटी यांच्या माध्यमातून जावळी तालुक्यातील सहकार वाढवण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करू, असे ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या मागे सर्वांनी खंबीरपणे उभे राहावे,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी तालुक्यातील ५१ विकास सेवा सोसायट्या, तसेच जावली सहकारी बँक, प्रतापगड सहकारी साखार कारखाना, जावली तालुका खरेदी विक्री संघ, विविध सहकारी पतसंस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती, व सहकार क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या सर्व सहकारी संस्थांचा व पदाधिकाऱ्यांचा सन्मान तसेच उत्कृष्ठ काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींचा विशेष गैारव मान्यवरांच्या हस्ते करून सहकार तज्ञांचे मार्गदर्शन तसेच बक्षीस वितरणही यावेळी करण्यात आले.
यावेळी मानकुमरे, सौरभ शिंदे, रांजणे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. महेश बारटक्के यांनी प्रास्ताविक केले. परिषदेला तालुक्यातील विविध विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक व सचिव तसेच जावली तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांचे चेअरमन, व्हा.चेअरमन व व्यवस्थापक यांच्यासह ग्रामस्थ व कार्येकर्ते उपस्थित होते.