सातारा : विलासपूर परिसरातील इंदिरानगर, डॉ. बापूजी साळुंखे नगर आणि राधिकानगर भागात ऐन उन्हाळ्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी संग्राम बर्गे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सातारा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित बारटक्के यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
सध्या उन्हाचा कडाका वाढला असून उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत विलासपूर परिसरात दररोज तब्बल बारा-बारा तास वीज गायब राहत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. घरात पंख्याविना राहणे कठीण झाले असून, याचा सर्वाधिक फटका लहान मुले आणि वृद्ध नागरिकांना बसत आहे. वाढत्या उकाड्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीतीही या निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.
यावेळी आक्रमक भूमिका मांडताना संग्राम बर्गे म्हणाले की, ऐन उन्हाळ्यात नागरिकांना अशा प्रकारे अंधारात ठेवणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्रशासनाने यावर तातडीने पर्याय शोधून वीज पुरवठा नियमित करावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी विजय बोबडे, नितीन भोसले, संजय चव्हाण, गणेश नलवडे, अमित साजणे, प्रदीप चौगुले, गोविंद नलवडे, श्रीकांत बुरुंगले, निशांत तवटे आणि रोहन भोसले यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
नागरिकांच्या या मागणीची दखल घेत कार्यकारी अभियंता अमित बारटक्के यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येत्या चार दिवसांत या तांत्रिक अडचणींवर ठोस उपाययोजना करून परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. महावितरणच्या या आश्वासनानंतर आता प्रत्यक्ष कार्यवाहीकडे विलासपूरवासीयांचे लक्ष लागले आहे.