सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या प्रकल्पांना निधी देणार

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे प्रतिपादन

by Team Satara Today | published on : 30 December 2024


सातारा : सातारा जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या प्रकल्पांना निधी देण्यात येईल. तसेच प्रकल्प गतीने पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

श्री सेवागिरी महाराज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे पुसेगाव येथे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, तहसीलदार बाई माने, डॉ. प्रिया शिंदे, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन सुरेश जाधव यांच्यासह देवस्थानचे विश्वस्त  उपस्थित होते.

पुसेगाव येथील गर्दी पाहता अंतर्गत रस्ता बाह्य रिंग रोड तयार करून वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यात येईल, असे सांगून सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भोसले म्हणाले, या रस्त्यासाठी स्थानिक नागरिकांचे सहकार्य मिळावे. स्थानिकांचे सहकार्य लाभल्यास कामे गतीने होतात. उरमोडी धरण हे सातारा तालुक्यात आहे. त्याचे पाणी आज दुष्काळी माण-खटाव तालुक्यात   जात आहे, यामुळे येथील ऊस शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

माण, खटाव व कोरेगाव तालुक्याला बारमाही पाणी मिळण्यासाठी सोळशी येथे धरण बांधण्यात येत आहे. या धरणातील पाणी जावली तालुक्यालाही मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करुन या धरणासाठी सहकार्य केले जाईल. सातारा जिल्हा हा आपला जिल्हा आहे येथील नागरिकांसाठी काम करावयाचे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या प्रकल्पांना निधी कमी पडू दिला जाणार नाही तसेच पुसेगाव गावासाठी ज्या ज्या सुविधा आवश्यक आहेत त्या दिल्या जातील असेही बांधकाम मंत्री भोसले यांनी यावेळी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्ह्याने अनुभवला राजघराण्याचा जिव्हाळा
पुढील बातमी
सौर ऊर्जा निर्मितीसाठी राज्याला केंद्राकडून २६० कोटी

संबंधित बातम्या