जिल्हा बँकेत 'झेडपी' पॅटर्नची पुनरावृत्ती नको; शशिकांत शिंदेंचा थेट इशारा, कोरेगावच्या बॅनरबाजीवरूनही दिले मोठे संकेत

by Team Satara Today | published on : 16 November 2026


सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीत जिल्हा परिषद निवडीसारख्या राजकीय घडामोडींची पुनरावृत्ती होऊ नये, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मांडली आहे.
सातारा येथे सोमवारी (दि. १६) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नरेश देसाई, राजकुमार पाटील, नितीन शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत महायुतीतील मित्रपक्षांच्या सदस्यांची पळवापळवी करून भाजपने सत्ता स्थापन केली, असा आरोप करत आता जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरूनही महायुतीत अंतर्गत रस्सीखेच सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड हा महायुतीचा अंतर्गत प्रश्न असला, तरी त्यात लोकशाही मूल्यांची पायमल्ली होऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील भाजप सरकार कोणालाही न जुमानता मनमानी कारभार करत असून, दबावतंत्र आणि अधिकारांचा गैरवापर करून सर्वसामान्य जनतेवर विविध प्रकल्प लादले जात असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. स्थानिकांना विश्वासात न घेता प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न सुरू असल्याने, संबंधित भागातील नागरिकांची संमती असेल तरच प्रकल्प राबवावेत; अन्यथा ते रद्द करावेत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांच्या प्रक्रियेत होणाऱ्या कथित गैरव्यवहारांबाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सरकारच्या धोरणांविरोधात राज्यभर अनेक मोर्चे आणि आंदोलने झाली, मात्र त्याची दखल घेतली जात नसून लोकशाही मार्गाने व्यक्त होणाऱ्या जनभावनांचा सरकारने आदर करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. ऊसदराच्या प्रश्नावरही शासन आणि साखर कारखानदारांनी समन्वय साधून लवकरात लवकर योग्य तोडगा काढावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेबाबत स्पष्टीकरण देताना शिंदे म्हणाले की, खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत यापूर्वीच योग्य भूमिका मांडली आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांची विलीनीकरणाची भावना असली, तरी सध्या असा कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे तूर्तास विलीनीकरणाचा विषय शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूला नऊ महिने पूर्ण होऊनही न्याय मिळत नसल्याबद्दल शिंदे यांनी खंत व्यक्त केली. या प्रकरणातील चौकशी आणि शासनाच्या भूमिकेमुळे संबंधित यंत्रणांच्या कामकाजावर संशय निर्माण होत असल्याचे सांगत, या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील विविध ठिकाणी महामार्ग आणि विकास प्रकल्पांसाठी शेकडो वर्षे जुन्या वृक्षांची मोठ्या प्रमाणावर तोड करण्यात आली. त्यानंतर सरकारकडून वृक्षलागवड केली जात असल्याचे जाहीर केले जाते, मात्र ही मोहीम प्रत्यक्षात कितपत प्रभावीपणे राबवली जात आहे, याबाबत त्यांनी शंका उपस्थित केली. वृक्षतोड आणि वृक्षलागवडीच्या कामकाजात पारदर्शकता असणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कोरेगाव तालुक्यातील बॅनरबाजी आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय हालचालींबाबत शिंदे यांनी सूचक भाष्य केले. सध्या सुरू असलेली बॅनरबाजी ही वादळापूर्वीची शांतता असून, वेळ आल्यावर आपण गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. जनहितासाठी पराभव आणि परिणामांची पर्वा न करता काम करण्याची आपली भूमिका असून, योग्य वेळ येताच मैदानात उतरून जिल्ह्याच्या राजकारणाचा रंग बदलवणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या विधानामुळे जिल्ह्यातील आगामी राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जनरेट्यापुढे अखेर वन विभाग झुकला; तारळीतील 'अदानी'च्या प्रकल्पाचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश

संबंधित बातम्या