सेंटरिंग कामगाराची मुलगी शहाजीराजे कॉलेजमध्ये प्रथम ; मयुरी लावंड हिने कॉमर्स शाखेत ८६ टक्के गुण मिळवत पटकावला प्रथम क्रमांक

by Team Satara Today | published on : 03 May 2026


खटाव : गरिबी, प्रतिकूल परिस्थिती आणि रोजच्या संघर्षालाही जिद्दीच्या जोरावर हरवता येते, याचे जिवंत उदाहरण खटाव येथील मयुरी संतोष लावंड हिने घालून दिले आहे. इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर होताच मयुरीने कॉमर्स शाखेत ८६ टक्के गुण मिळवत शहाजीराजे कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आणि कष्टकरी आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

मयुरीचे वडील संतोष लावंड हे सेंटरिंगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर आई आशा लावंड या संसाराला खांदा लावून शेतात राबत घराची जबाबदारी पार पाडतात. रोजच्या कष्टातून मुलांच्या शिक्षणासाठी पैसा साठवणाऱ्या या आई-वडिलांनी नेहमीच एकच मंत्र दिला — “आमच्यासाठी संतती हीच खरी संपत्ती आहे; तुम्ही फक्त शिका, पैशाची चिंता करू नका.”

घरची परिस्थिती बेताची असल्याने मयुरीने कोणताही खासगी क्लास न लावता महाविद्यालयात शिकवलेल्या प्रत्येक तासावर विश्वास ठेवला. घरी परतल्यावर मिळेल त्या वेळेत सातत्याने अभ्यास, उजळणी आणि मेहनत सुरू ठेवली.

अभ्यासासोबतच तिच्या खांद्यावर घरातील जबाबदाऱ्यांचाही मोठा भार होता. आई शेतात गेल्यावर घरातील स्वयंपाक, धुणीभांडी, गुरांचा गोठा साफ करणे, घर आवरणे ही सर्व कामे करून मगच ती पुस्तकांसमोर बसत होती. अनेकदा थकलेल्या शरीराने अभ्यास केला, पण स्वप्नांवरचा विश्वास मात्र कधी डळमळला नाही.

“आई-वडील आमच्या भविष्यासाठी रात्रंदिवस कष्ट करताना पाहिले की, आणखी जोमाने अभ्यास करावासा वाटायचा. त्यांचे हात कष्टाने झिजले, पण आमचे आयुष्य घडावे म्हणून त्यांनी कधीच तक्रार केली नाही. त्यांच्या त्यागाचे चीज करायचे, हेच माझे ध्येय होते,” असे मयुरीने भावूक होत सांगितले.

मयुरीची मोठी बहीण दिव्या एमसीएचे शिक्षण घेत असून लहान भाऊ मयुरने यंदा दहावीची परीक्षा दिली आहे. शिक्षणाची परंपरा जपत हे कुटुंब संघर्षातून पुढे चालले आहे. भविष्यात एमबीए फायनान्स करून स्वतःचे करिअर घडवण्याचे स्वप्न मयुरीने उराशी बाळगले आहे. तिच्या या यशाबद्दल प्राचार्य डॉ.जितेंद्र कदम , पर्यवेक्षक केशव जाधव, सर्व प्राध्यापक वर्ग तसेच खटाव ग्रामस्थांनी तिचे कौतुक करत अभिनंदनाचा वर्षाव केला.

मयुरीच्या यशाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, जिद्द आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाच्या बळावर यशाचे शिखर गाठता येते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुलांच्या मनात बुद्धांचे सदाचार रुजवा - मुख्याध्यापिका सुनिता वाघमारे; गोडोलीत बुद्ध जयंती साजरी
पुढील बातमी
सेल्फीसाठी मिसिंग लिंकवर थांबू नका; एमएसआरडीसीचे वाहनधारकांना आवाहन

संबंधित बातम्या