सातारा : महापुरुषांच्या अस्मितेचे रक्षण करणारा आणि वादग्रस्त वक्तव्य करणार्याला कठोर शासन करणारा कायदा राज्य शासन व केंद्र शासनाने तत्काळ पारित करावा यासाठी खासदार उदयनराजे भोसले आग्रही आहेत. या कायद्याची येत्या 12 तारखेला रायगडावरून होणार्या कार्यक्रमामध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे, असा ठाम विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला. तसेच केंद्र शासनाने पारित केलेला वक्फ बोर्ड कायदा हा मुस्लिम बांधवांच्या हितासाठी आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
सौराष्ट्र सोमनाथ येथे पवित्र अशा शिवलिंगाची प्रतिष्ठापना येत्या काही महिन्यात होणार आहे. या शिवलिंगाच्या काही अवशेषाचे आगमन येथील जलमंदिर मध्ये झाले होते. त्या अनुषंगाने आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचे विश्वस्त दर्शक हातीजी यांचे जलमंदिर येथे आगमन झाले. तसेच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकाळी उदयनराजे भोसले यांची जलमंदिर येथे भेट घेतली. या दोन्ही अनौपचारिक भेटींमध्ये उदयनराजे यांनी उभयतांचे पुष्पगुच्छ शाल देऊन स्वागत केले. सौराष्ट्र सोमेश्वरचे हे पवित्र शिवलिंग शनिवार दि 5 रोजी सायं 6 वाजेपर्यंत येथील कनिष्क मंगल कार्यालयात सातारकरांना दर्शनासाठी उपलब्ध राहणार आहे.
या घडामोडींच्या पाश्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, येत्या 3 नोव्हेंबर रोजी सौराष्ट्र सोमनाथ येथे या पवित्र शिवलिंगाची पूर्ण स्वरूपात रचना केली जाणार आहे. या शिवलिंगाला एक वेगळे ऐतिहासिक आणि अध्यात्मिक महत्त्व आहे. या कार्यक्रमासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. मूळच्या शिवलिंगाच्या काही रचना शंकराचार्य मठामध्ये संरक्षित करण्यात आल्या होत्या. त्या दृष्टीने या ऐतिहासिक रचनांचे जलमंदिर येथे आगमन झाले आहे. आजचा दिवस हा फार पवित्र आहे. तसेच महापुरुषांच्या अस्मितांचे रक्षण करणारा आम्हाला अपेक्षित असणारा कठोर कायदा केंद्रशासन लवकरच पारित करेल. याबाबतची घोषणा येत्या 12 एप्रिल रोजी रायगड येथे छत्रपती शिवरायांच्या तिथीनुसार पुण्यतिथी कार्यक्रमाच्या दिवशी होऊ शकते. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये या कायद्याची घोषणा होईल. छत्रपती शिवरायांची राजधानी रायगड येथे या कायद्याची घोषणा होणे ही अत्यंत औचित्यपूर्ण बाब आहे, असे ते म्हणाले.
केंद्र शासनाने संमत केलेल्या वक्फ बोर्डाच्या कायद्यासंदर्भात त्यांना विचारले असता उदयनराजे म्हणाले, हा कायदा मुस्लिम समाजातील मुस्लिम बांधवांच्या हितासाठी आहे. वक्फ बोर्डाच्या ताब्यात असलेल्या जमिनीचे तसेच मालमत्तेचे प्रामाणिकरण करणे हे महत्त्वाचे आहे. त्याचे नियमन आणि त्यातील द्रव्य बळाचा मुस्लिम समाजातील मुस्लिम बांधवांसाठी वापर करणे, त्यातून कल्याणकारी योजना राबवणे हा खरा या कायद्याचा हेतू आहे. मात्र विरोधकांकडून या कायद्याचा अपप्रचार केला जात आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांचे मुस्लिम प्रेम अचानक का उफाळून आले, असेही सांगितले जात आहे. पण विरोधकांना नेहमीच सगळे वाईटच दिसते. ज्यावेळी कॉंग्रेसची सत्ता होती त्यांनी या संदर्भात या कायद्याचा विचार का केला नाही? आणि आता जर भारतीय जनता पार्टी कडून मुस्लिम समाजाच्या हिताचा निर्णय घेतला जात असेल तर विरोधक पोकळ वल्गना गावात करत आहेत, अशी टोलेबाजी उदयनराजे यांनी केली. तसेच सातार्यात आयटी पार्कचा प्रस्ताव जमीन हस्तांतरण व प्रत्यक्ष कार्यवाही या दृष्टीने अंतिम टप्प्यात आहे. याबाबतची घोषणा लवकरच उद्योग मंत्रालयाकडून होईल, असे ते म्हणाले.