सातारा : सातारा जिल्हा महसूल खाते वर्ग-3 कर्मचारी संघटनेने प्रलंबित विविध मागण्यांसाठी दि. 21 ऑगस्ट पासून बेमुदत लेखणी बंद आंदोलन, तसेच 19 ते 20 ऑगस्ट दरम्यान सामुदायिक रजा आंदोलनाचा इशारा सातारा जिल्हा प्रशासनाला दिला असून याबाबतची मागणीही पत्रकाद्वारे सातारा जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे.
याबाबत सातारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, सहाय्यक महसूल अधिकारी व महसूल सहाय्यक यांच्याकडे सातारा जिल्हाधिकार्यांनी स्वतंत्र कार्यभार दिल्याने सहा. महसूल अधिकारी यांना कनिष्ठ दर्जाचे कामकाज करावे लागत आहे. ही बाब सातारा जिल्हा महसूल खाते (वर्ग-3) कर्मचारी संघटनेला मान्य नाही. याबाबत जिल्हाधिकारी स्तरावरुन कारवाई न झाल्यास आंदोलन करणार असल्याचे या संघटनेने जिल्हाधिकार्यांना निवेदनाद्वारे कळविले आहे.
पुणे विभाग केवळ सहाय्यक महसूल अधिकारी व महसूल सहाय्यक यांच्याकडे स्वतंत्र कार्यभार दिलेला असून उर्वरित चार जिल्ह्यांमध्ये असे सहा. महसूल अधिकारी यांना कनिष्ठ दर्जाचे कामकाज करण्याचे आदेश दिलेले नाहीत. असे असताना सातारा जिल्ह्यात स्वतंत्र आदेशाद्वारे सहा. महसूल अधिकारी यांना महसूल सहाय्यक या पदाचा कार्यभार देण्यात आलेला आहे. ही बाब सहा. महसूल अधिकारी संवर्गावर अन्यायकारक आहे. तसेच पुणे विभागात केवळ सातारा जिल्ह्यातच अशी बाब घटत आहे. परंतू यासंदर्भात सातारा जिल्हाधिकार्यांना वारंवार निवेदनाद्वारे कळवूनही त्यांच्या स्तरावरुन यासंदर्भात कोणताही तोडगा निघत नसल्याने सातारा जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी काम बंद आंदोलन करण्याबाबत ठाम आहेत. तसेच दिवंगत महसूल कर्मचारी व इतर शासकीय कर्मचार्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती दिली जाणार असल्याने रिक्त पदे कमी होण्यास मदत होणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता अद्याप याबाबत तोडगा न निघाल्याने सातारा जिल्हा महसूल खाते वर्ग-3 कर्मचारी संघटना सातारा यांनी दि. 21 ऑगस्ट 2025 पासून बेमुदत लेखणीबंद आंदोलन तसेच दि. 19 ते 20 ऑगस्ट दरम्यान सामुहिक रजा आंदोलनाचा इशारा सातारा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनावर संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष सागर कारंडे व कार्याध्यक्ष संतोष झनकर यांच्या स्वाक्षर्या आहेत.