भाविपच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की प्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल; काँग्रेस आणि अभाविपचे कार्यकर्ते समाेरासमोर आल्याने काही काळ तणाव

by Team Satara Today | published on : 22 August 2026


पुणे : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमापूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सायंकाळी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहासमोर घोषणाबाजी केल्याची घटना घडली. अभाविपच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ, तसेच धक्काबुक्की केल्याप्रकरणी काँग्रेसचे पुष्कर आबनावे, भूषण रानभरे, अक्षय जैन, सौरभ अमराळे, प्रथमेश आबनावे, सागर धाडवे यांच्यासह ५० ते ६० कार्यकर्त्यांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत ‘अभाविप’चे कार्यकर्ते मल्हार नीलेश पाटील (वय १९) याने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाचे शनिवारी (दि. २२) ‘एसएसपीएमपीएस’ प्रशालेच्या मैदानावर आयोजन करण्यात आले होते. त्यापूर्वी शुक्रवारी (दि. २१) शिवाजीनगर येथील सीओईपी हॉस्टेल येथील एका विद्यार्थिनीवर दबाव टाकून तिच्याकडून एक व्हिडिओ स्टेटमेंट घेण्यात आले होते. यासंदर्भात विचारपूस करण्यासाठी आलेल्या अभाविपच्या दोघांना एनएसयुआय व युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचे पाटील याने फिर्यादीत म्हटले आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी दबाव आणला, असा आरोप अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केला. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी मुख्य प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी केली. काँग्रेस आणि अभाविपचे कार्यकर्ते समाेरासमोर आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमर काळंगे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
पुढील बातमी
नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा मोठा दिलासा; ३५० रुपयांत एका महिन्याचा अमर्याद लोकल पास

संबंधित बातम्या